बियाण्याबाबत मुंगळा गाव स्वयंपूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:32+5:302021-06-16T04:53:32+5:30

वाशिम : बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून मुंगळा येथील बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात घरगुती बियाणे तयार केले असून, ...

Mungala village is self-sufficient in seeds! | बियाण्याबाबत मुंगळा गाव स्वयंपूर्ण !

बियाण्याबाबत मुंगळा गाव स्वयंपूर्ण !

Next

वाशिम : बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून मुंगळा येथील बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात घरगुती बियाणे तयार केले असून, याच बियाण्यांचा वापर पेरणीसाठी यंदा करण्यात आला. बियाण्याच्या बाबतीत मुंगळा गाव स्वयंपूर्ण झाले असून आतापर्यंत ८० टक्के पेरणीही आटोपली आहे.

मुंगळा येथील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाची जय्यत पूर्वतयारी केली. विविध कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्यापेक्षा घरचेच दमदार बियाणे तयार करण्याला प्राधान्य दिले. याला कृषी विभागाची साथ मिळाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांच्या मार्गदर्शनामध्ये सूत्रबद्ध कार्यक्रम आखला व कृषी सहायकांनी मुंगळा येथे हा कार्यक्रम काटेकोर राबविला. यामध्ये प्रथम शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर चांगले व जोमदार असलेल्या भागातील पिकातील वेगळ्या जातीची झाडे उपटून टाकावयास लावली. त्या सोयाबीनची वेगळी काढणी, सुकवणी करून व उगवण क्षमता तपासून तांत्रिकरित्या त्याची साठवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेचा परिपाक म्हणून मुंगळा येथील शेतकरी यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून आजपर्यंत जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे व जवळपास ९५ टक्के बियाणे हे घरगुती आहे. तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरूणकर, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत उलेमाले, कृषी सहाय्यक रुस्तुम सोनवणे, संजय जहागीरदार यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य होऊ शकले, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

....

बॉक्स

परिसरातील शेतकऱ्यांनाही बियाणे विक्री

मुंगळा येथील शेतकऱ्यांनी उच्च प्रतीचे घरगुती बियाणे तयार केले आहे. सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत गाव तर स्वयंपूर्ण झालेच आहे; याशिवाय परिसरातील १० ते १२ गावांमधील शेतकऱ्यांनादेखील जवळपास ३०० ते ३५० क्विंटल उच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे विक्री केले आहे.

Web Title: Mungala village is self-sufficient in seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.