महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; बोगस डाॅक्टरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:12+5:302021-06-26T04:28:12+5:30
वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक ...
वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक जण एमबीबीएस, बीएएमएस असल्याचे भासवितात. ग्रामीण भागात त्याची फारशी शहानिशा कोणी करत नसल्याने हा प्रकार अलीकडच्या काळात अधिकच फोफावला आहे. अशा बोगस डाॅक्टरांमुळे मात्र वेळप्रसंगी रुग्णांचा जीवही धोक्यात सापडतो. त्यामुळे चुकीच्या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने धडक कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
...................
२५
जिल्ह्यात एकूण बोगस डाॅक्टर्सवर कारवाई
०५
विनापरवाना सुरू असलेल्या रुग्णालयांवर कारवाई
.................
तालुकानिहाय बोगस डाॅक्टर्स
वाशिम - ७
रिसोड - ६
मालेगाव - ३
कारंजा लाड - ६
मानोरा - ३
.............................
तक्रार आली तरच कारवाई
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकांश गावांमध्ये बोगस डाॅक्टर्सकडून रुग्णांवर उपचार केले जातात. असे असताना संबंधिताची तक्रार आल्याशिवाय आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनीही सतर्क राहून अशा बोगस डाॅक्टरांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
......................
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
१) कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील अनेकांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अशा प्रकारची लक्षणे दिसून आली. असे असतानाही बहुतांश लोकांनी अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी न करताच घरगुती उपचार करण्यावर भर दिला. गावात स्वत:ला डाॅक्टर म्हणविणाऱ्यांकडून मिळणाऱ्या गोळ्या खाऊन अनेकांनी कोरोनाच्या संसर्गाला हलक्यात घेतले.
२) आरटीपीसीआर चाचणी केल्यास आणि त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास शहरातील कोविड केअर हाॅस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागणार. त्यात वेळ आणि पैसेही खर्च होणार, या भीतीने ग्रामीण भागातील अनेकांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यास प्राधान्य दिले. कोरोनाचा संसर्ग अधिक बळावल्यानंतर मात्र याच मंडळींनी शहरांकडे धाव घेतली. मात्र, तोवर बराच उशीर झाल्याने अनेकांना जीवदेखील गमवावा लागला.
३) शहरांमधील नावाजलेल्या एमबीबीएस डाॅक्टरांच्या दवाखान्यांमध्ये कंपाउंडर म्हणून काम करणारे बहुतांश लोक हे गावखेड्यात वास्तव्याला आहेत. गावात त्यांना डाॅक्टर म्हणूनच ओळखले जाते. कुठलाही आजार झाल्यास अनेक जण त्यांच्याकडून मिळणाऱ्या उपचारावर विश्वास ठेवतात. नेमका हाच प्रकार कोरोनाच्या काळातही घडला.