शिकारीच्या वादातून कवठा येथील इसमाची हत्या
By admin | Published: November 2, 2015 03:00 AM2015-11-02T03:00:41+5:302015-11-02T03:00:41+5:30
आरोपीला अटक; न्यायालयापुढे आज करणार हजर.
रिसोड (जि. वाशिम): वन्यप्राण्याच्या शिकारीच्या वादातून कवठा खुर्द येथील इसमावर प्राणघातक हल्ला झाला होता. जखमी इसमाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. शामा कंठू भोसले (४५) असे मृतकाचे नाव असून, याप्रकरणी संदीप आत्माराम पुंड (२७) या आरोपीस पोलिसांनी अटक केली. रिसोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान कवठा येथील आरोपी संदीप पुंड हा शामा भोसले यांच्या घरी जाऊन शिकारीची मागणी करीत होता. शाम भोसले याने संदीप यास आज शिकार केली नसल्याचे सांगितले. त्यांनतरही संदीप पुंड हा तू केलेली शिकार दे, असा वारंवार तगादा शामा यांच्याकडे लावत होता. या दरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीचा वाद विकोपाला जाऊन संदीप पुंड याने शामा भोसले यांच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकूचा वार करून जबर जखमी केले. जखमी भोसले यास पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे भरती करण्यात आले होते. भोसले यांचा अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच त्यांना अकोला येथे सामान्य रुग्णालयात उपचार करून औरंगाबाद येथे पुढील उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान भोसले यांचा औरंगाबाद येथे ३१ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेच्या दुसर्या दिवशीच पोलिसांनी आरोपी संदीप पुंड यास अटक करून प्रारंभी कलम ३२६, ३ (१) १0 भादंवि नुसार जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. न्यायालयात आरोपीला हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, जखमी भोसले यांचा मृत्यू झाल्याने सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा वर्ग करण्यात आल्याने आरोपीस पोलीस पुन्हा ताब्यात घेऊन खुनाच्या तपास कामाकरिता पोलीस कोठडीत घेण्याकरिता न्यायालयासमोर हजर करणार आहेत. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहे.