आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय!
By संतोष वानखडे | Published: June 28, 2023 02:01 PM2023-06-28T14:01:07+5:302023-06-28T14:01:28+5:30
आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे.
वाशिम : यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी २९ जूनला आले आहेत. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा व मांस विक्री न करण्याचा निर्णय रिसोड तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी घेतल्याने, आषाढी एकादशीच्या दिवशी हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोप्याचे दर्शन पाहायला मिळणार आहे.
आषाढी एकादशी अवघ्या काही तासांवर आली आहे. यामुळे प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. हिंदू समाजाचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे. हिंदु बांधवांसाठी आषाढी एकादशी हा महत्त्वाचा दिवस असून यासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येत भाविक हे पंढरपूर येथे मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.
हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे सण एकत्रच आले असले तरी रिसोड तालुक्यात मात्र मुस्लिम बांधवांनी स्तुत्य निर्णय घेतल्याने एकोप्याचे दर्शन घडणार आहे. बकरी ईद रोजी कुर्बानी दिली जाते. मात्र, यंदा कुर्बानी न देण्याचा आणि मांस विक्री न करण्याचा निर्णय रिसोड तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.