वणीत मुस्लीम बांधव एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:00 AM2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:21+5:30
भारतीय मुस्लिम संघर्ष समितीच्या पुढाकारात, शहरातील सामाजिक संघटनांच्या सहभागात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ वणीतीलच नव्हे, तर मारेगाव, राजूर (कॉलरी), मुकूटबन येथील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. येथील शासकीय मैदानावर दुपारी १२ वाजतापासूनच मुस्लिम बांधवांचे जत्थेच्या जत्थे मोर्चासाठी एकत्र येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याविरोधात शुक्रवारी वणीत हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. मोर्चा काढून मुस्लिम बांधवांनी रोष व्यक्त केला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर पोहोचला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भारतीय मुस्लिम संघर्ष समितीच्या पुढाकारात, शहरातील सामाजिक संघटनांच्या सहभागात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ वणीतीलच नव्हे, तर मारेगाव, राजूर (कॉलरी), मुकूटबन येथील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. येथील शासकीय मैदानावर दुपारी १२ वाजतापासूनच मुस्लिम बांधवांचे जत्थेच्या जत्थे मोर्चासाठी एकत्र येत होते. एनआरसीला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरूद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शुक्रवारी नमाज पठणानंतर शासकीय मैदानावर एकत्र आलेल्या मुस्लिम बांधवांनी दुपारी ३ वाजता मोर्चाला शिस्तबद्ध सुरूवात केली. हा मोर्चा टिळक चौक, आंबेडकर चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, नेताजी चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, गांधी चौक, खाती चौक यामार्गे पुन्हा टिळक चौकात पोहोचला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने एसडीओ डॉ.शरद जावळे यांना निवेदन दिले. त्यानंतर टिळक चौकात सभा पार पडली. मोर्चाचे नेतृत्व रज्जाक पठाण, शाहीद खान, अॅड.जाहीद शरीफ, नईम अजीज, रफिक रंगरेज, इजहार शेख, जम्मू शेख, शमीम अहेमद, पुरूषोत्तम पाटील, अॅड.विप्लव तेलतुंबडे, मिलींद पाटील, मंगल तेलंग, सिद्धीक रंगरेज, जिया रब यांच्यासह अनेकांनी केले. मोर्चादरम्यान एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, शिरपूरचे ठाणेदार सतीश चवरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग
वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम बांधवांच्या मोर्चात महिलांचाही विक्रमी सहभाग दिसून आला. केवळ सहभागच नाही, तर टिळक चौकात पार पडलेल्या सभेमध्ये महिलांनी आपल्या भाषणातून सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढविला. त्यात हिना खान, शिरीन खान, अॅड.फौजीया शेख, आचल पाटील, उजमा फातेमा अहेमद यांचा समावेश होता. दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी या मोर्चात हजेरी लावली.