रमजानच्या सामूहिक आनंदाला यंदाही मुकणार मुस्लिम समाजबांधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:24+5:302021-04-17T04:40:24+5:30
मुस्लिम समाजात रमजान महिना हा धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना गणला जातो. यात आबालवृद्ध खुदाची विशेष इबादत करतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांत ...
मुस्लिम समाजात रमजान महिना हा धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना गणला जातो. यात आबालवृद्ध खुदाची विशेष इबादत करतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांत सर्वदूर आनंद असतो. वाशिम जिल्ह्यातही रमजान महिना उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम कॅलेंडरनुसार नववा असलेला हा महिना खुदाच्या इबादतचा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वजण आपल्या शारीरिक ऐपतीप्रमाणे निर्जला उपवास करतात. त्यांचा हा उपवास दररोज सूर्योदयापूर्वी सुरू होतो, तर सूर्यास्ताला संपतो. त्यावेळी मुस्लिम बांधव एकत्र येऊन दररोज इफ्तार साजरी करतात. रमजान महिनाभर दररोज रात्रीला मुस्लिम बांधव तरावीहची विशेष नमाज अदा करतात. त्यासोबतच दररोज कुरआन पठण करून इतरही धार्मिक विधी सातत्याने पार पाडतात. रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाचा समारोप ईदच्या दिवशी केला जातो. यावेळी मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट देतात. विशेष म्हणजे, हिंदू बांधवदेखील या उत्सवात हिरीरीने सहभागी होत सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवतात. परंतु, कोरोनाने या सणाच्या आनंदावर गतवर्षी विरजण पडले. यंदाही तीच स्थिती आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने आणि कोरोना संसर्ग वाढत असल्याने रमजानच्या सामूहिक आनंदाला यंदाही मुस्लिम समाजबांधव मुकणार आहेत.