मुठ्ठा गावातही रोहयोच्या कामांमध्ये घोटाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:44 PM2019-08-09T14:44:33+5:302019-08-09T14:44:40+5:30
वाशिम : वाघळूद, ब्राम्हणवाडा या गावांप्रमाणेच मालेगाव तालुक्यातील मुठ्ठा या गावातही रोहयोच्या कामांमध्ये लाखोंचा घोटाळा झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाघळूद, ब्राम्हणवाडा या गावांप्रमाणेच मालेगाव तालुक्यातील मुठ्ठा या गावातही रोहयोच्या कामांमध्ये लाखोंचा घोटाळा झाला. याप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या समितीने थातूरमातूर चौकशी केली असून ही समिती देखील भ्रष्टाचाऱ्यांना मॅनेज झाली, असा आरोप मुठ्ठा येथील गावकऱ्यांनी केला. याप्रकरणी विभागीय स्तरावरून चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी; अन्यथा स्वातंत्र्यदिनी, १५ आॅगस्ट रोजी गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला.
मालेगाव तालुक्यातील गट ग्राम पंचायत वाघळूदमध्ये येणाºया मुठ्ठा या गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड, नाला रुंदीकरण, शौच खड्डे, ई क्लास जमिनीवर शेततळे आदी कामे प्रस्तावित होती; मात्र कामे कागदोपत्री दाखवून देयके काढण्यात आली. गावातील अनेकांच्या घरानजिक अद्यापही शौचखड्डे तयार झालेले नाहीत. यासह रोहयोची इतरही कामे न करताच मलिदा लाटण्यात आला. ३० जुलै २०१९ रोजी लेखापाल यांची विशेष ग्रामसभा वाघळूद येथे होणार होती. त्या सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर चर्चा होणार होती; परंतु ऐनवेळी वाघळूदऐवजी मुठ्ठा या गावात ग्रामसभा घेण्यात आली. त्याची रितसर दवंडी न दिल्याने ग्रामस्थ हजर राहू शकले नाही. या सर्व बाबींची विभागस्तरीय चौकशी करावी व शासनाची दिशाभूल करून रोहयोचा निधी हडपणाºया सरपंच, सचिवावर कठोर कारवाई करावी; अन्यथा मुठ्ठा येथील गावकरी १५ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर वाघळूद ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश जाधव, सतिश चांडे, हरिभाऊ निंबाळकर, भागवत डोंगरदिवे, सुनील खंडारे, बळीराम डोंगरदिवे, विलास जाधव, नारायण निंबाळकर, नारायण चांडे, गजानन जाधव, संजय चांडे, विष्णू चांडे, नंदकिशोर चांडे, मोतीराम खंडारे, नामदेव चांडे, भानदास बोरकर, विठ्ठल चांडे, नवनाथ चांडे, मनोज खंडारे, गजानन खिल्लारे, माधव कढणे, शालीक चांडे, अशोक कांबळे, श्रीराम चांडे, श्रीकृष्ण चांडे, बालाजी चांडे, भागवत साबळे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.