वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची परस्पर वसुली; अधिकारी अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:39 PM2020-07-16T12:39:35+5:302020-07-16T12:39:41+5:30
काही कर्मचारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर वसुली करीत असल्याचे १५ जुलै रोजी वाशिम - मंगरुळपीर रस्त्यावर दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेसी यांनी दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठया प्रमाणात कारवाई करीत आहेत. याचाच गैरफायदा घेत काही कर्मचारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर वसुली करीत असल्याचे १५ जुलै रोजी वाशिम - मंगरुळपीर रस्त्यावर दिसून आले. एक किलोमिटर अंतरावरील एकाच मार्गावरील तीन ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसून आल्याने सदर प्रकार उघडकीस आला.
कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हयात विना परवाना वाहने दाखल होवू नये याकरिता वाहनांची तपासणी, तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये नियमानुसार प्रवासी संख्या आहे किंवा नाही यासह वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम संपूर्ण जिल्हयात सुरु आहे. वाशिम शहरातील मंगरुळपीर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल ते जागमाथा या १ कि.मी. अंतरावर बुधवारी तीन ठिकाणी चार वाहतूक शाखेचे कर्मचारी आढळून आलेत. शेलुबाजारकडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या चेक पोस्टनजिक असलेल्या दोन कर्मचाºयांना विचारणा केली असता त्यांनी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. तर थोडया अंतरावर असलेल्या कर्मचाºयाने सुध्दा शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. मागे उभे असलेले कर्मचारीही शहर वाहतूक शाखेचेच असल्याचे सांगत आहेत असे म्हटल्यावर त्याने नाही ते जिल्हा वाहतूक शाखेचे असतील असे सांगून तेथून निघून गेला. तर जागमाथा येथे असलेला कर्मचारी काहीच न बोलता निघून गेला. अधिकाºयांशी चर्चा केली असता पेट्रोलिंगवर कर्मचारी फिरतात परंतु एकाच मार्गावर नाही. त्यावरुन पेट्रोलींगवर असलेले कर्मचारी वगळता ईतर दोन कर्मचारी अधिकाºयांना न सांगताच परस्पर वसुली करीत होते असे दिसून येते.
शहरातील विविध भागात पेट्रोलिंगसाठी वेगवेगळया भागात कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. एकाच मार्गावर तीन ठिकाणी वाहतूक कर्मचारी असतील तर त्यामध्ये जिल्हा वाहतूक शाखेचे असू शकतात. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी एकाच मार्गावर असतील तर याची चौकशी करण्यात येईल.
- राजू वाटाणे,
शहर वाहतूक शाखा, वाशिम
वाहतूक नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या आहेत. एकाच रस्त्यावर तीन ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी राहू शकत नाहीत. तरी तसे घडले असेल तर याची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा व शहर वाहतूक शाखेला देण्यात येतील.
- वसंत परदेसी,
पोलीस अधीक्षक , वाशिम