नोटाबंदीचा रब्बी पीककर्ज वाटपाला फटका
By admin | Published: January 6, 2017 07:15 PM2017-01-06T19:15:54+5:302017-01-06T19:15:54+5:30
नोटांबदीमुळे रब्बी पीककर्ज वाटप प्रक्रियेला जबर फटका बसला असून, ५ जानेवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यात केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
संतोष वानखडे /ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ६ - नोटांबदीमुळे रब्बी पीककर्ज वाटप प्रक्रियेला जबर फटका बसला असून, ५ जानेवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यात केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप झाले. ३६ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट असून, केवळ १० कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले.
८ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँक, अर्बन बँकाच्या खरिप पीककर्ज वसुलीला जबर फटका बसला. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील पीककर्ज वाटप प्रक्रियाही ठप्प झाली. विविध प्रकारच्या बँकांनी एकूण ३६ कोटी रुपयांचे रब्बी पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले होते. यापैकी केवळ १० कोटी कर्ज वाटप झाले असून, याची टक्केवारी २८ अशी येते. सर्वाधिक फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाला बसला. आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप मध्यवर्ती बँकेने केलेले होते. यावर्षी ऐन रब्बी हंगामात नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याने आणि मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध लादल्याने केवळ ३० सभासद शेतकऱ्यांना २४ लाखाचे पीककर्ज वाटप करण्यात आले. १७.२० कोटींचे रब्बी पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला होते.