वाशिम जिल्ह्यात १३ दिवसांत केवळ ३५ शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:45 PM2018-04-03T15:45:11+5:302018-04-03T15:45:11+5:30
वाशिम : जिल्ह्यात १९ व २० मार्चपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला आणि विदर्भ को-आॅप फेडरेशन लि. नागपूर यांच्याकडून चना खरेदी सुरू करण्यात आली.
वाशिम : जिल्ह्यात १९ व २० मार्चपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला आणि विदर्भ को-आॅप फेडरेशन लि. नागपूर यांच्याकडून चना खरेदी सुरू करण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये किमान आधारभूत किंमतीअंतर्गत चना खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, याअंतर्गत गेल्या १३ दिवसांत केवळ ३५ शेतकऱ्यांकडून ५९२ क्विंटल चना खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या चार ठिकाणी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला यांच्याकडून चना उत्पादक शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करून घेण्यात आली. याअंतर्गत एकूण ७७१ श्ेतकऱ्यांनी नोंदणी केली. ३१ मार्चअखेर त्यातील २६ शेतकऱ्यांकडून ४८८ क्विंटल चना खरेदी करण्यात आला. तसेच मंगरूळपीर आणि कारंजा येथे विदर्भ को-आॅप. फेडरेशन लि. नागपूर यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या दोन केंद्रांवर ९७६ चना उत्पादक शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ९ शेतकऱ्यांकडून १०३ क्विंटल चना खरेदी करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नोंदणी केलेल्या एकूण १,७४७ शेतकºयांपैकी १,७१२ शेतकऱ्यांकडून अद्याप चना खरेदी करणे बाकी आहे. मात्र, हा माल साठवणूकीचा प्रश्न ऐरणीवर असल्याने सद्य:स्थितीत नाफेडचे सर्वच खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.