‘नाफेड’चे धनादेश होताहेत ‘बाऊन्स’!
By admin | Published: May 26, 2017 01:57 AM2017-05-26T01:57:13+5:302017-05-26T01:57:13+5:30
खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक विवंचनेत : पैशांअभावी खोळंबली शेतीची कामे
शिखरचंद बागरेचा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घे:न ‘नाफेड’मार्फत प्रत्यक्षात तूर खरेदी करण्यात आली; मात्र यासाठी ‘नाफेड’ने नेमलेल्या संस्थांकडून शेतकऱ्यांना चुकाऱ्यापोटी दिले जाणारे धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देऊन चक्क ‘बाऊन्स’ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
शासनाने ‘नाफेड’च्या खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतर निधीअभावी उधारीवरच तूर खरेदी सुरू आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धनादेश तुरीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. असे असताना ‘नाफेड’कडून यासाठी नेमण्यात आलेल्या ठराविक संस्थांकडून शेतकऱ्यांना धनादेश दिल्यानंतर संबंधित खात्यात निधीची कमी असल्याचे कारण समोर करून शेतकऱ्यांचे धनादेश ‘बाऊन्स’ होत असल्याने शेतकऱ्यांना चुकारे मिळणे कठीण झाले आहे.
केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून त्यांच्या शेतमालाची रक्कम रोखऐवजी धनादेशाव्दारे मिळू लागली. चलन तुटवड्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले धनादेशसुद्धा बँकांमध्ये न वटता अनादरीत होत होते. आता नाफेडचेही चेक बाऊन्स होत असल्यामुळे नेमके काय करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने नाफेडमार्फत हमीदरात तूर खरेदीचा निर्णय घेतला; परंतु शासकीय तूर खरेदी शेतकऱ्यांसाठी फायद्याऐवजी तोटा देणारी ठरत आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य वेळी चुकारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाळ्याची चाहूल लागलेली असताना शेतजमीन तयार करण्यासाठी तसेच पेरणीसाठी पैसा कोठून आणावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
विदर्भ कृषी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्थेच्या खात्यात रक्कमच नाही!
अनसिंग येथील पांडुरंग ठाकरे अध्यक्ष असलेल्या विदर्भ कृषी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्थेच्या खात्यात रक्कमच नसल्यामुळे संस्थेमार्फत शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाऱ्यापोटी दिले जाणारे धनादेश ‘बाऊन्स’ होत आहेत. यात जांभरूण महाली येथील केशव गणपत महाले या कास्तकाराचा ७६ हजार ६९० रुपयांचा धनादेश, भगवान निंबाजी शेळके यांचा ५५ हजार ४४९ रुपयांचा धनादेश; तर दिनकर भगवान शेळके यांचा १ लाख २६ हजार २५० रुपयांचा धनादेश ‘बाऊन्स’ झाला असून, इतरही अनेक शेतकरी या समस्येमुळे बहुतांशी आर्थिक संकटात सापडले आहेत. ‘नाफेड’ आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून तुरीच्या मालाचे पैसे वेळेत कसे मिळतील, याची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
नाफेड केंद्रावर आपण तूर विकली असून, ८ मे २०१७ या तारखेचा ७६ हजार ६९० रुपयांचा धनादेश (क्रमांक ३६५८५) सेंट्रल बँक आॅफ इंडियाचा मिळाला आहे. सदर धनादेश ११ मे व २३ मे या तारखांना ‘अॅक्सीस’ बँकेत वटविण्यासाठी खात्यात जमा केला होता; मात्र दोन्ही वेळेला खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश वटविल्या गेला नाही. त्यामुळे आपणावर आर्थिक संकट कोसळले असून, व्यवहार कसा करावा, तसेच शेतीची मशागत व पेरणीची व्यवस्था कशी लावावी, हा यक्षप्रश्न आपल्यासमोर उभा ठाकला आहे.
- केशव गणपत महाले
क ास्तकार, जांभरुण महाली
नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या कास्तकारांना देण्यात आलेले धनादेश बँकेत अनादर झाल्याचा प्रकार आपणास माहीत झाला आहे. याबाबत चौकशी करुन संबंधित कास्तकारांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
- पांडुरंग ठाकरे
अध्यक्ष, विदर्भ कृ षी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्था, अनसिंग
नाफेड केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीमार्फत मोबदला धनादेशाद्वारे दिला जात आहे. नाफेडकडून दिली जाणारी रक्कम सोसायट्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे धनादेश अनादर होणे अशक्य आहे, असा प्रकार घडला असेल तर याबाबत चौकशी केली जाईल.
- मनोज बाजपेयी
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ‘नाफेड’