नाफेड बंद; शेतकऱ्यांचा टाहो!

By admin | Published: April 26, 2017 01:15 AM2017-04-26T01:15:13+5:302017-04-26T01:15:13+5:30

शासन-प्रशासनासमोर शेतकरी हतबल : चहुबाजूने येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी होतोय गारद

Nafed off; Taha! | नाफेड बंद; शेतकऱ्यांचा टाहो!

नाफेड बंद; शेतकऱ्यांचा टाहो!

Next

संतोष वानखडे - वाशिम
चोहोबाजूने येणाऱ्या संकटाचा सामना करताना, अगोदरच गारद झालेल्या शेतकऱ्यांना आता नाफेड खरेदी बंदमुळे पुन्हा एकदा विद्यमान परिस्थितीच्या खेळीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पाच हजार ५० रुपये दरांची कोणतीही ‘हमी’ नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात तूर विकावी लागत आहे.
सन २०१३ ते २०१५ या दरम्यान निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामात पावसाच्या अनियमित हजेरीने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर पावसाने दगा दिल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती. सलग तीन वर्षे वाशिम जिल्हा दुष्काळाच्या छायेत होता. शासनाने दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषितही केले होते. सन २०१६ या वर्षात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले. मात्र, या वर्षातच शेतमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. अल्प हमीभाव असतानाही बाजार समित्यांमध्ये हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होत नसल्याचे सर्वश्रूत आहे. १८०० ते २४०० रुपयादरम्यान सोयाबीनची विक्री करावी लागली. नवीन तूर बाजारात येण्यापूर्वी ९ हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक बाजारभाव होते. नवीन तूर बाजारात येताच, बाजारभाव ४००० हजारापर्यंत खाली आहे. शासनाने ५०५० रुपये हमीभाव जाहिर केले. मात्र, शेतमालाची प्रतवारी उच्च दर्जाची नसल्याच्या कारणाहून बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी शेतमालाचे बाजारभाव पाडले. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून शासनाने नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू केले. या खरेदी केंद्रांवर हालअपेष्टा सहन करीत शेतकऱ्यांनी तूर विकली. १५ एप्रिल ही नाफेड खरेदीची शेवटची मुदत असताना राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सात दिवसांची मुदतवाढ दिली. त्यानुसार २२ एप्रिलपर्यंत तूरीची खरेदी करण्यात आली. मात्र, या नाफेड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मोजणीअभावी तूर तशीच पडून आहे. आजरोजी जवळपास ३९ हजार क्विंटलच्या आसपास तूर नाफेडच्या ओट्यांवर पडून आहे. नाफेड केंद्राजवळ वाहनांच्या रांगा असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना या वाहनाचे भाडेही देणे आहे. एकिकडे तूर खरेदी बंद आणि दुसरीकडे वाहनाचा भुर्दंड अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकले आहेत. नाफेडची खरेदी बंद झाल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी तूरीचे बाजारभावही पाडले. ३५०० ते ४००० या दरम्यान तूरीची खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

उत्पादन वाढीनंतर बाजारभाव पाडण्याचे षडयंत्र
शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी शासन-प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातात. दुसरीकडे उत्पादन वाढले की बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. यावर्षी तूरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाली. मात्र, बाजारभाव निम्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गतवेळी उत्पादन कमी झाले होते. मात्र, बाजारभाव नऊ हजारापेक्षा जास्त होते. यावर्षी उत्पादनात वाढ झाली. मात्र, बाजाराभाव निम्यावर आले. बाजारभाव पाडण्याचे षडयंत्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे.

नाफेडची खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेकडो शेतकरी बाजार समितीमध्ये तूर विक्रीसाठी आले आहेत. हजारो क्विंटल तूर बाजार समितीच्या परिसरात वाहनांत पडून आहे. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून नाफे डची तूर खरेदी तातडीने सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कदापिही सहन करणार नाही.
-चंद्रकांत ठाकरे, सभापती कृऊबास मंगरुळपीर, जि.प. उपाध्यक्ष, तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँगे्रस वाशिम

शेतमालाला बाजारभाव नसल्याने आणि अन्य काही कारणांमुळे अगोदरच शेतकरी हवालदिल झालेले आहेत. हमीभावानुसार सुरू असलेली नाफेडची खरेदीही आता बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होणे गरजेचे आहे. नाफेड खरेदी ही ३१ मे पर्यंत सुरू ठेवणे शेतकऱ्यांच्या हितावह आहे. शेतकऱ्यांच्या न्यायोचित मागणीसाठी लवकरच आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.
- विश्वनाथ सानप, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद वाशिम.

मागील तीन वर्षे निसर्गाची साथ मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. २०१६ या वर्षात निसर्गाची साथ मिळाली; पण शासनाची साथ मिळाली नाही. सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ तर सोडा; पूर्वीसारखेही दिन राहिले नाहीत. शेतमालाला अत्यल्प बाजारभाव, हमीभावानुसार खरेदी नसणे आणि आता नाफेडची खरेदी बंद आदी बाबींवरून शेतकऱ्यांचे ‘बुरे दिन’ आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
- हेमेंद्र ठाकरे, माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प. वाशिम


बाजार समितीच्या यार्डवर नाफेडकडे आलेली दीडशे शेतकऱ्यांची चार हजाराहून अधिक क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. आम्ही फेबु्रवारी महिन्यापासून नियाजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना टोकण देणे सुरू केले होते. त्यामधील टोकण मिळालेल्या ५६० शेतकऱ्यांच्या तुरीची मोजणी झाली नाही. नाफेडने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा खरेदी सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.
-नीलेश भाकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा लाड
--

Web Title: Nafed off; Taha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.