नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला वाशिमात ‘खो’
By admin | Published: October 29, 2016 02:29 AM2016-10-29T02:29:24+5:302016-10-29T02:29:24+5:30
अजून कोणत्याच हालचाली नाही; मातीमोल भावाने सोयाबीनची खरेदी.
वाशिम, दि. २८- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी होत असतानाही, जिल्हय़ात अद्याप 'नाफेड'चे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही. आता तर कृषी उत्पन्न बाजार समित्या दिवाळीच्या सुट्यांवर गेल्याने शेतकर्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
गत तीन वर्षांंपासून वाशिम जिल्हय़ातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. यावर्षी निसर्गाची साथ मिळाल्याने पीक परिस्थिती बर्यापैकी आहे; मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकर्यांची ह्यदैनाह्ण संपता संपेना, अशी परिस्थिती आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा दर होता. आता हा दर दोन ते अडीच हजार रुपयांदरम्यान स्थिरावत आहे. शेतकर्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये क्विंटल असा हमीभाव दिला. त्यामुळे बाजार समित्यांनी यापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करणे नियमात बसणारे नाही. तथापि, या हमीभावाला धाब्यावर बसवून जिल्हय़ात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला २000 ते २६00 असा बाजारभाव दिला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर असल्याने प्रशासनाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू करणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही जिल्हय़ात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. शेतकर्यांची आर्थिक लूट सुरू असतानाही, याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष शेतकर्यांच्या मुळावर उठत आहे. याकडे जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष देण्याची मागणी जि.प. सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी शुक्रवारी केली.