नगर पंचायत कर्मचा-यांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन
By admin | Published: December 27, 2016 02:23 AM2016-12-27T02:23:21+5:302016-12-27T02:23:21+5:30
आंदोलनात मालेगाव आणि मानोरा नगर पंचायत कर्मचा-यांचा सहभाग.
मानोरा, दि. २६- ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतमध्ये होऊनही कर्मचार्यांच्या समायोजनाचा तिढा मात्र १७ महिन्यांपासून कायम आहे. त्यामुळे कंटाळलेल्या मानोरा आणि मालेगाव नगर पंचायतमध्ये कार्यरत कर्मचार्यांनी सोमवार, २६ डिसेंबर रोजी ह्यकामबंदह्ण आंदोलन करून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला.
जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव ग्रामपंचायतीचे १७ जुलै २0१५ रोजी नगर पंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आले. यासह नगर विकास विभागाने नगर पंचायतीच्या आकृतीबंधास महिनाभरातच मान्यतादेखील दिली. मात्र, कर्मचार्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
नगर पंचायती अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचार्यांना नगर पंचायतीच्या कामकाजाचे प्रशिक्षणसुद्धा अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे नगर पंचायतीत कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे. असे असताना त्यांना ग्रामपंचायत कर्मचार्यांप्रमाणेच सुविधा मिळत आहेत. तथापि, मानोरा आणि मालेगाव नगर पंचायतीत कार्यरत कर्मचार्यांचे नगर पंचायतीत समायोजन करून त्यानुसार वेतनश्रेणी लागू करावी. यासह नगर पंचायत कर्मचार्यांप्रमाणे सुविधा लागू कराव्यात, आदी न्यायोचित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता दोन्हीही नगर पंचायतमध्ये कार्यरत कर्मचार्यांनी २६ डिसेंबर रोजी कामबंद आंदोलन करून शासकीय धोरणांचा निषेध नोंदविला.
आजच्या आंदोलनात मालेगाव नगर पंचायतचे कर्मचारी एकनाथ आढाव, महादेव राऊत, संजय दहात्रे, प्रमोद हरणे, संतोष खवले, अवि काटेकर, शंकर इंगोले, शंकर बळी, विश्वपाल काटेकर, गणेश भनंगे, बबन पखाले, प्रकाश बळी, विठ्ठल चोपडे, सय्यद इरफान, गणेश भालेराव, महादेव ठाकरे, माणिक मोहले, शेख शोयब, सतीश महाकाल, रवी शर्मा, नागनाथ माने, इंद्रायणी अवचार, सुनील घायाळ, शंकर बळी, अतुल बळी, शेख बब्बू, श्रीराम सुर्वे, सतीश देवकते, सफाई कर्मचारी गंगा पवार, प्रमिला बोयन, राखी सौदवे, गजानन गायकवाड सहभागी झाले होते.