अंजनखेड्याच्या खून प्रकरणाचे नागपूर ‘कनेक्शन’
By Admin | Published: June 6, 2017 01:12 AM2017-06-06T01:12:10+5:302017-06-06T01:12:10+5:30
पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश : खून प्रकरणातील वाहन ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच तथा कंत्राटदार बबन भागवत पायघन (वय ५०) यांची अज्ञात इसमांनी हत्या केल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. या हत्याकांडामध्ये नागपूर येथील आरोपींचा समावेश असून, एका पोलीस कर्मचाऱ्यासह वाहनचालकाला ५ जून रोजी ताब्यात घेतले.
अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे रस्ता बांधकाम सुरू असलेल्या कामाकडे घोडबाभूळ शिवारात गेले होते. सुरू असलेल्या कामाची पाहणी करायला जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली व त्यांच्या बोटामधील सोन्याच्या अंगठ्या व सोनसाखळी असा २ लाखाचा ऐवजही लंपास केला होता. यावेळी मारेकऱ्यांनी वापरलेल्या चार चाकी वाहनाने एका इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्यामुळे वाहनाचे लाईट व काचा घटनास्थळावर आढळून आल्या. या चार चाकी वाहनाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक वाठोरे व पोलीस शिपाई राजेश बायस्कर यांना नागपूरच्या दिशेने पाठविले. नागपूरकडे जात असताना या दोघांनीही किमान २२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारावर नागपूर येथून एम.एच. ३१ सी.एम. ७२६५ क्रमांकाचे (ईनोवा) वाहन ताब्यात घेतले. या वाहनाची तपासणी केली असता मारेकऱ्यांनी वाहनाचे तुटलेले भाग बदलवून वाहन पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीमध्ये ठेवले.
या वाहनाची नागपूर (वाडी) येथील एका गॅरेजवर दुरूस्ती केली होती. त्या ठिकाणाहून पोलिसांनी वाहनाचे मूळ स्थितीमध्ये असलेले स्पेअर पार्टस् व वाहन पोलिसांनी जप्त केले. याशिवाय एका पोलीस कर्मचाऱ्यासह वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती हाती आली आहे. वृत्त लिहेपर्यंत अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, ठाणेदार सुनील अंबूलकर व त्यांचे पथक अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपिंची कसून चौकशी करीत आहेत. खून प्रकरणातील आरोपींची नावे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी अधिकृतरीत्या जाहीर केली नाहीत.
वैमनस्यातून झाले हत्याकांड
बबन पायघन यांची हत्या वैमनस्यातून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पायघन यांची हत्या करण्यासाठी मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला व नागपूर येथील पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.