दुर्धर आजार बरे करण्याच्या नावावर रुग्णांच्या आर्थिक लुबाडणूकीचा गोरखधंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:53 PM2018-07-25T12:53:28+5:302018-07-25T12:57:54+5:30

वाशीम : आयुर्वेदिक औषधांनी दुर्धर आजार बरा करण्याच्या नावावर रुग्णांना लक्षावधी रुपयांनी लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

In the name of healing ' financial robbery! | दुर्धर आजार बरे करण्याच्या नावावर रुग्णांच्या आर्थिक लुबाडणूकीचा गोरखधंदा!

दुर्धर आजार बरे करण्याच्या नावावर रुग्णांच्या आर्थिक लुबाडणूकीचा गोरखधंदा!

Next
ठळक मुद्देलोकांची मानसिकता ओळखून हे त्यांना उपचाराचे प्रलोभन दाखवून काही हजार ते लाख रुपयापर्यंत फसवणूक करतात.अशा लोकांचे परिसरात काही खाजगी दलाल सुद्धा कार्यरत दिसून येत आहेत.एक वा दोन तीन वेळा औषधे घेऊनही काहीच सुधारणा दिसत नसल्याने नंतर रुग्णांना काहीतरी मंत्र तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम :आयुर्वेदिक औषधांनी दुर्धर आजार बरा करण्याच्या नावावर रुग्णांना लक्षावधी रुपयांनी लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.कोणतेही आयुर्वेदिक पदवी न घेतलेली ही टोळी विविध रुग्णालयात उपचार घेणाºया लोकांना लक्ष करते. शहरी व ग्रामीण भागात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची मानसिकता ओळखून हे त्यांना उपचाराचे प्रलोभन दाखवून काही हजार ते लाख रुपयापर्यंत फसवणूक करतात. गावोगावी आयुर्वेदिक चूर्ण आणि इतर आयुर्वेदिक औषधे विक्री करतात. दुर्धर आजाराचा रुग्ण असल्याची माहिती मिळताच यांचे खरे कार्य सुरू होते.
      अशा लोकांचे परिसरात काही खाजगी दलाल सुद्धा कार्यरत दिसून येत आहेत. आयुर्वेदिक औषधांमुळे मला खूप लाभ झाला असून ते आजारातून बाहेर आल्याचे पटवून सांगतात. रुग्णांच्या नातेवाईकांनी विचारपूस केल्यावर त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला जातो. संबंधित व्यक्तीशी नातेवाईकांशी बोलणे झाल्यावर त्यांचा रुग्ण चांगल्या पद्धतीने सामान्य जीवन जगत असल्याचे पटवले जाते. नातेवाईकांची खात्री झाल्यावर हे भोंदू वैद्य अत्यंत कमी तपासणी शुल्क घेऊन रुग्णांना महागडी भस्मे आणि इतर औषधे लिहून देतात. आयुर्वेदिक औषधांची   भस्मे महागडी असून ही सर्व आयुर्वेदिक औषधे शहरातील विशिष्ट आयुर्वेदिक दुकानातूनच खरेदी करण्याची अट घालतात. भोंदू वैद्यांनी लिहून दिलेली सदर औषधे शहरातील कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळत नसल्याने रुग्ण पुन्हा या भोंदूकडे परत जातात .मग त्यांना विशिष्ट आयुर्वेदिक दुकानांचा पत्ता दिला जातो. शहरात कुठेही न मिळणारी सदर काल्पनिक नावे असलेली ही भस्मे किंवा इतर औषधे त्या विशिष्ट आयुर्वेद दुकानात मात्र उपलब्ध असतात आणि ती सुद्धा अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये. भोंदू वैद्याने सुवर्णभस्म लिहून दिले असता तो दुकानदार चक्क सोनेरी रंगाचे भस्म ग्रॅम ग्रॅम ने मोजून देतो. वास्तविक पाहता सुवर्णभस्म हे सोनेरी नसून काळ्या रंगाचे असते. भोंदू वैद्याने लिहून दिलेल्या यादीची किंमत हजारोंच्या घरात जाते. आजारातून बरे होण्याच्या आशेने रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक ही बोगस महागडी औषधे खरेदी करतात. एक वा दोन तीन वेळा औषधे घेऊनही काहीच सुधारणा दिसत नसल्याने नंतर रुग्णांना काहीतरी मंत्र तांत्रिक गोष्टींमध्ये अडकवले जाते.
अशा प्रकरणामुळे आयुवेर्दाविषयी जनतेच्या मनात गैरसमजूत निर्माण होऊन रुग्ण निराशेच्या गर्तेत ढकलल्या जातात.अनेक रुग्ण त्यांचे अनुभव नंतर सांगतात आणि फसवणूक झाल्याचे मान्य करतात , परंतु कुणीही पोलिसात तक्रार करत नाहीत. तक्रार होत नसल्याने अशा भोंदू वैद्यांचे फावत चालले आहे. खेडोपाडी चूर्ण,वट्या गुट्या घेऊन यांचा गोरखधंदा राजरोशपणे सुरू असतो. ह्या प्रकाराचे बळी फक्त अडाणी लोक नसतात तर समाजातील सुशिक्षित लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.कोणतीही आयुवेर्दाची मान्यताप्राप्त पदवी नसतांना अनेक बेरोजगार सुद्धा हा गोरखधंदा करतांना दिसतात. नागरिकांनी याबाबत सावधता बाळगणे गरजेचे झाले आहे.

कुठलीही आयुर्वेदाची पदवी नसलेल्या भोंदूकडून उपचार घेण्याची परंपरा अनेक वर्षांपासून नागरिकांकडून चालत आली आहे. परंतु ही पध्दत चुकीची असून एखादयाच्या जिवावर बेतण्यासारखी आहे. भोंदू वैद्यांकडून उपचार न घेता त्यांची तक्रार करुन त्यांचे पितळ उघडे पाडण्याची गरज आहे.
- डॉ दीपक ढोके, राज्यसदस्य,  महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन अंतर्गत 
बनावट  डॉक्टर प्रतिबंधक समितीे

Web Title: In the name of healing ' financial robbery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.