छायाचित्र नसणाऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:07 PM2021-02-25T17:07:38+5:302021-02-25T17:07:50+5:30
Washim News जिल्ह्यातील संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
वाशिम : मतदान कार्डवर छायाचित्र नसणे, स्थलांतरण, स्थायी पत्यावर न राहणे आदी कारणावरून जिल्ह्यातील संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. तत्पूर्वी संबंधितांकडून १ मार्चपर्यंत आक्षेप मागविले आहेत.
जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम व कारंजा अशा सहाही तालुक्यात अनेक मतदारांचे मतदान कार्डवर रंगित छायाचित्र नाही. मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) स्थळ पंचनामा केल्यानंतर अनेकजण स्थायी पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनात आले आहे. कारंजा तालुक्यात बीएलओ यांनी स्थळ पंचनामा करून ६०३ जणांची नावे मतदार यादीमधून वगळण्यासाठी नमुना ७ चे अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयास सादर केले आहेत. या ६०३ मतदारांची यादी कारंजा तहसीलदार कार्यालय, कारंजा नगरपरिषद, पंचायत समिती तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा आदी तालुक्यातही नावे वगळण्यात येणाºया मतदारांच्या नावाची अशी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसणाऱ्या मतदारांचे छायाचित्र संकलित करण्यासाठी बीएलओ यांनी त्यांच्या मतदार यादीतील मतदारांच्या पत्त्यावर भेटी दिल्या; मात्र संबंधित मतदार त्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे छायाचित्र संकलित करणे शक्य झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने बीएलओ यांनी याबाबतचा स्थळ पंचनामा केला आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयात सादर केले आहेत. मतदार यादीतून वगळण्यात येणाऱ्या कारंजा तालुक्यातील ६०३ व्यक्तींच्या नावाची यादी उपरोक्त ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप असल्यास १ मार्च २०२१ पर्यंत आपले आक्षेप अर्ज मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कारंजा किंवा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, कारंजा यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.