"नमो" खुलवणार वाशिम शहराचा चेहरा !
By दिनेश पठाडे | Published: October 28, 2023 03:21 PM2023-10-28T15:21:55+5:302023-10-28T15:22:02+5:30
या अंतर्गत राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे.
वाशिम : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ७३ शहरांमध्ये ''नमो शहर सौंदर्यीकरण अभियान'' राबविण्याचा निर्णय नुकताच नगर विकास विभागाने घेतला आहे. यात वाशिम नगर परिषदेचा समावेश करण्यात आला आहे. सौंदर्यीकरण, स्वच्छता आदी उपक्रम यशस्वीपणे राबविल्यास शहराचा चेहरा खुलणार आहे. त्या अनुषंगाने स्थानिक नगर परिषद प्रशासनाने नियोजन सुरु केले आहे.
नागरी भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सुख-सोयी मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे शहरांचे सौंदर्य टिकून राहावे या हेतूने लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात केवळ वाशिम नगर परिषदेचा यात समावेश झाला आहे. अभियानासाठी लोकाभिमुख, समाजसुधारक, प्रसिद्ध व्यक्ती यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण टिकून रहावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश शासनाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी दिले आहेत. तथापि, यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध न करता स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या स्व-निधीतूनच खर्च करावा लागणार असल्याने निधीची अडचण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.