वाशिममधील नारायणबाबा तलावाचे रुपडे पालटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:56 PM2019-03-09T17:56:18+5:302019-03-09T17:56:43+5:30
वाशिम : राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाºया नारायणबाबा तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने ७ मार्च रोजी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाºया नारायणबाबा तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने ७ मार्च रोजी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविली आहे. यामुळे नारायणबाबा तलावाचे रुपडे पालटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद आहे, की राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम येथील नारायणबाबा तलावातील पाण्याचे प्रदुषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदुषण रोकण्यासाठी उपाययोजना करणे, तलावात साचलेला अनावश्यक व आॅरगॅनिक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकविण्यासाठी अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्याकरिता उपाययोजना करणे, जैविक प्रक्रियेव्दारा तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे, किनारा सौंदर्यीकरण, हरीतपट्टा विकसीत करणे, कुंपन घालणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार, कमी किंमतीची स्वच्छतागृहे, जनजागृतीसाठी कार्यक्रम तसेच प्रदुषण रोकण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार करावयाच्या उपाययोजनांसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नगर पालिका मुख्याधिकाºयांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच प्रथम हप्त्याचा निधीही शासनाने मंजूर केला.