राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना : नोंदणी अर्ज भरण्यास शिक्षकांना तांत्रिक अडचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 03:47 PM2019-12-20T15:47:09+5:302019-12-20T15:48:20+5:30
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नोंदणी क्रमांक मिळण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नोंदणी क्रमांक मिळण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गतच्या कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आले. ३० नोव्हेंबरऐवजी आता ३१ जानेवारी आणि १ डिसेंबर ऐवजी आता १ फेब्रुवारी असे बदल करण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाºया जिल्हा परिषदेच्या १०० टक्के अनुदानित पदावरील शिक्षकांना व मान्यता प्राप्त खासगी १०० टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू आहे. या कर्मचाºयांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १३ डिसेंबरच्या निर्णयाद्वारे केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (एनपीएस) समाविष्ठ करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबतची कार्यपद्धती शिक्षण विभागाने १३ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली नोंदणी क्रमांक मिळण्यास विलंब होणे, कर्मचाºयांचे विहित नमुन्यातील अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने या योजनेच्या कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात येत आहे. या पद्धतीत ज्या ठिकाणी ३० नोव्हेंबर २०१९ नमूद करण्यात आलेले आहे तेथे त्याऐवजी ३१ जानेवारी २०२० व ज्या ठिकणी १ जानेवारी २०१९ नमूद करण्यात आलेले आहे, तेथे १ फेब्रुवारी २०२० असा बदल करण्यातआला आहे. या बदलानुसार आता नोंदणीची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार वाशिम जिल्हयात या योजनेंतर्गतची कार्यवाही केली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.