मानोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; डझनावर कार्यकर्ते भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:33 PM2019-09-09T14:33:52+5:302019-09-09T14:35:02+5:30
मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर पक्षबदलाचे वारे जोरात वाहू लागले असून, वाशिम जिल्ह्यातही हे लोण पसरत आहे. यात मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. त्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे समर्थक उमेश पाटील ठाकरे व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराचे सत्रच सुरू झाले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. आता पक्षांतराचे लोण वाशिम जिल्ह्यातही पसरत असून, मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा जिल्ह्याध्यक्ष उमेश ठाकरे व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी उपसभापती देवनाथ भोयर यांच्यासह डझनावर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. यात पंचायत समिती सदस्य गजानन भवाने, नरेंद्र राऊत, विनोद ठाकरे, शेतकरी सुतगिरणी, दारव्हाचे संचालक विठोबा पाटील, कुपट्याचे सरपंच रवि दिघडे, कोलारचे माजी उपसरपंच विनोद पाटील, गोपाल धोटे व सचिन घोडे आदींचा समावेश आहे. मानोरा तालुक्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गाजविणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
(प्रतिनिधी)