नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:31 PM2017-10-01T13:31:21+5:302017-10-01T13:31:44+5:30
वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा-२०१८ ही १० फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यात घेतली जाणार आहे. याकरिता परीक्षेची आवेदन पत्रे २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरुपात स्वीकारली जाणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात सहाव्या व आठव्या वर्गात प्रवेश देण्यासाठी निवड चाचणी परीक्षा घेतली जाते. जवाहर नवोदय विद्यालय हे भारत सरकार संचालित असून, ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी दर्जेदार अद्यावत शिक्षण देणारे जिल्ह्यातील एकमेव निवासी विद्यालय आहे. प्रवेशासाठी होणारी निवड चाचणी परीक्षा पात्र ठरल्यास इयत्ता सहावीपासून ते दहावी, बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था या शाळेत आहे. ही निवड चाचणी परीक्षा १० फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र (सी. एस. सी.) येथून ही आॅनलाईन आवेदन पत्रे भरता येतील, असे वाशिम जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. के. घोगरे यांनी सांगितले.