वाशिममध्ये नव्या वर्षात सुरू होणार ‘एनसीसी’ बटालियन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:49 PM2020-01-01T14:49:19+5:302020-01-01T14:49:24+5:30
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार असून त्याठिकाणी दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये एकता, देशप्रेम आणि शिस्त निर्माण व्हावी, या उद्देशाने १५ जुलै १९४८ पासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एन.सी.सी. सुरू करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिम जिल्ह्यालाही एन.सी.सी. बटालियन मंजूर होते; मात्र पर्याप्त जागेअभावी हा प्रश्न प्रलंबित होता. विद्यमान जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या प्रयत्नांमुळे तो आता निकाली निघाला असून नव्या वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार असून त्याठिकाणी दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी एन.सी.सी.मध्ये दाखल आहेत. त्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण मिळावे, यासाठी एन.सी.सी. बटालियन आवश्यक होते. त्यास अनेक वर्षांपूर्वी मंजूरी देखील मिळाली; मात्र पर्याप्त जागेसह अन्य सुविधांअभावी हा प्रश्न प्रलंबित होता.
दरम्यान, शासनाकडे सलग पाठपुरावा करून तथा वाशिम-रिसोड रस्त्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विनावापर पडून असलेल्या जागेस मंजूरी मिळवून तिथे एन.सी.सी. बटालियन सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. नव्या वर्षात आर्मीची विशेष चमू वाशिममध्ये दाखल होऊन जिल्ह्यातील ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.