एनसीसी बटालियनचे प्रशिक्षण केंद्र गुलदस्त्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:09 PM2021-01-05T12:09:55+5:302021-01-05T12:10:06+5:30
Washim News कोरोनाच्या संकटामुळे प्रश्न ‘जैसे थे’ राहिला असून अद्याप प्रशिक्षण केंद्र सुरू होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिम जिल्ह्यालाही एन.सी.सी. बटालियनचे प्रशिक्षण केंद्र मंजूर होऊन ५ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. जागा मंजुरीअभावी प्रलंबित असलेला हा प्रश्न तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गी लावला होता. जानेवारी २०२० या महिन्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ताब्यातील जागा मंजूर करण्यात आली; मात्र त्यानंतर उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रश्न ‘जैसे थे’ राहिला असून अद्याप प्रशिक्षण केंद्र सुरू होऊ शकले नाही. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी एन.सी.सी.मध्ये दाखल आहेत. त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळावे, यासाठी एन.सी.सी. बटालियन आवश्यक आहे. त्यास अनेक वर्षांपूर्वी मंजुरीदेखील मिळाली; मात्र पर्याप्त जागेसह अन्य सुविधांअभावी हा प्रश्न प्रलंबित होता. दरम्यान, शासनाकडे सलग पाठपुरावा करून तथा वाशिम-रिसोड रस्त्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विनावापर पडून असलेल्या जागेस मंजुरी मिळवून तिथे एन.सी.सी. बटालियन सुरू करण्यास शासनाने हिरवा झेंडा दाखवला. सन २०२० मध्येच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार होते. त्या ठिकाणी दरवर्षी शाळास्तरावरील एनसीसीमध्ये दाखल ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यानुसार, आर्मीचा विशेष चमू वाशिममध्ये दाखल होऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचा निर्णय झाला होता; परंतु त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे एनसीसी बटालियन प्रशिक्षण केंद्राचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस प्रयत्न करून केंद्र सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
विद्यमान जिल्हाधिकारी अनभिज्ञ
एनसीसी बटालियनच्या प्रशिक्षण केंद्राचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्यास हजारो विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. असे असताना विद्यमान जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस. यांना याबाबत छेडले असता, ते यासंदर्भात पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. मी नव्यानेच रुजू झाल्याने माहिती घेतल्यानंतर चर्चा करू, असे सांगून त्यांनी हात झटकले.