राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घराणेशाहीचा पक्ष -पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 05:11 PM2019-04-07T17:11:44+5:302019-04-07T17:31:11+5:30
रिसोड (वाशिम) : आजोबापासून ते नातवापर्यंत एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष ठरला आहे, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : आजोबापासून ते नातवापर्यंत एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष ठरला आहे, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केली. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा-सेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रिसोड येथील आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजना यासह अनेक कल्याणकारी योजनेतून सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून विकासाची गंगा आणली आहे. ग्रामविकास विभागाच्या ‘२५:१५’ या लेखाशिर्षाखाली वाशिम-अकोला जिल्ह्यातही विकासात्मक कामांसाठी लाखो रुपयांचा निधी दिलेला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच खालच्या पातळीवरचे राजकारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आता एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी देत मतदारांवर घराणेशाही लादली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण चालविले आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण करणाºयांना जनता कधीही माफ करणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यापेक्षा वेगळे नसून, त्यांच्याकडेही विकासाचा ठोस कार्यक्रम नसल्याची टिका मुंडे यांनी केली.
यावेळी व्यासपिठावर अकोला लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार संजय धोत्रे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासह रिपाई ए, राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, भाजपा, शिवसेना पदाधिकाºयांची उपस्थिती होती.