सुसाट हवा सुटली अन् भव्यदिव्य टोलनाका जमिनदोस्त; सुदैवाने जिवितहानी टळली, वाशिमनजिकची घटना
By सुनील काकडे | Published: September 30, 2022 05:37 PM2022-09-30T17:37:23+5:302022-09-30T17:38:27+5:30
तुरळक पाऊस सुरू असताना सुसाट वेगात हवा सुटली अन् क्षणात भव्यदिव्य स्वरूपातील टोलनाका जमिनदोस्त झाला.
वाशिम: तुरळक पाऊस सुरू असताना सुसाट वेगात हवा सुटली अन् क्षणात भव्यदिव्य स्वरूपातील टोलनाका जमिनदोस्त झाला. ही घटना शहरानजिकच्या वाशिम-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगानजिक आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यावेळी टोलनाक्यानजिक एकही वाहन उभे नव्हते. त्यामुळे जिवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, वाशिमपासून काहीच अंतरावर असलेल्या तोंडगावनजिक राष्ट्रीय महामार्गावर एकाचवेळी ८ वाहने निघू शकतील, असा भव्यदिव्य टोलनाका उभारण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. असे असताना आज दुपारच्या सुमारास सुसाट वेगात हवा सुटल्यानंतर हा टोलनाका काही कळण्याच्या आत जमिनदोस्त झाला. यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले, याची प्रचिती आली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट; नागरिकांचे मदतकार्य
अचानक टोलनाका कोसळल्याने त्याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली. आसपासच्या शेतात काम करत असलेल्या शेतकरी, शेतमजूरांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मदतकार्य करून टोलनाक्याखाली असलेल्या काही कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.