जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:38 PM2019-11-10T15:38:17+5:302019-11-10T15:39:08+5:30
वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि त्यामुळे गावागावात उडणारी त्रेधातिरपीट, शेतशिवारांमधील पिकांची पुरेशा पाण्याअभावी होणारी हानी. हे प्रकार थांबवायचे असतील तर प्रथम पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात वाशिम तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...
गावागावात जल व मृद संधारणाची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी काय करणे अपेक्षित आहे?
- दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणायची असेल तर गावागावात जल व मृद संधारणाची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. अर्थात ही कामे माथा ते पायथा याप्रमाणे तथा शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शेतशिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तेथेच मुरला तर दुष्काळाला हरविणे सहजसाध्य होईल. पावसाळ्यात पूर आल्यास केवळ पाणी वाहत नाही तर त्यासोबत शेतातील सुपीक माती देखील वाहून जाते. त्यामुळे मृद व जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने करून पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासोबतच सुपीक मातीचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.
यात कुठली कामे करणे आवश्यक आहे ?
- सी.सी.टी, दगडी बांध, छोटा माती बांध, वृक्ष लागवड यासारखे उपचार खूप परिणामकारक ठरतात. माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबत वाहून जाणारी माती अडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील गावातील प्रत्येक व्यक्त्तीने किमान दोन तास श्रमदान केले तरी मृद व जलसंधारणाची कामे दर्जेदार होणे शक्य आहे. श्रमदानातून एक घनमीटर काम पूर्ण झाले तरी किमान हजार लिटर पाणी अडते. हेच पाणी भूगर्भात मुरण्यास मदत होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.
गावे पाणीदार करण्यासाठी काय करता येईल?
- शेतात जेथून पाणी वाहून जाते, त्याठिकाणी ६ मिटर गोलाई व ३ मिटर खोलीचा एक खड्डा तयार करून त्याचा बाजूला एक शोष खड्डा तयार करावा. मातीविरहित पाणी ‘रिचार्ज पिट’ मध्ये घेऊन उर्वरित पाणी बाहेर सोडावे. यामुळे गरजेनुसार शुद्ध पाणी भूगर्भात मुरण्यास मदत मिळते. परिणामी, भूगर्भाची पातळी वाढण्यासोबतच शेतातील सुपीक माती शेतातच थांबण्यास मदत मिळून भविष्यात गावे पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही.