वाशिम जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षीत; स्मारकांवरील नावेही झाली पुसट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 11:30 AM2020-08-09T11:30:57+5:302020-08-09T11:31:05+5:30
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ आॅगस्ट १९४२ या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच दिवशी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करण्याची पहिली ठिणगी पडली होती. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी यादिवशी प्रथमच क्रांतीची भाषा करून इंग्रजांविरूद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. त्यापुढील काळात १५ आॅगस्ट १९४७ पर्यंत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जिल्ह्यातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली; स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर त्याच स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जीवाचे बलिदान देणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शहीद स्तंभ व स्मारक उभारल्या गेले आहेत; मात्र केवळ स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिन अथवा अन्य राष्ट्रीय सणांच्या दिवशीच या स्मारकांची थातूरमातूर पद्धतीने स्वच्छता केली जाते. यावर्षी तर स्मारक परिसरात स्वच्छताही करण्यात आली नसल्याचे क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला रिसोड, शिरपूर, वाशिम, मालेगाव, कारंजा येथे केलेल्या पाहणीत दिसून आले. रिसोड येथे पंचायत समिती परिसरात असलेल्या स्मारकासभोवताल निरूपयोगी झाडेझुडपे वाढली आहेत तर जिल्ह्यातील काही स्मारकांचा रंग पूर्णत: उडण्यासह त्यावरील नावेही पुसट झाली आहेत. कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव येथील स्मारकांना सौंदर्यीकरणाची प्रतिक्षा आहे.
शिरपूर येथील स्मारकाची दुरावस्था
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होवून प्राणाची आहूती देणाºया शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिरपूर येथे स्वातंत्र्य सेनानी स्मारकाची उभारणी करण्यात आली. सुरूवातीची २५ ते ३० वर्षे येथे नियमित कार्यक्रमांचे आयोजन व्हायचे; परंतु कालांतराने या स्मारकस्थळी कार्यक्रम घेणे बंद झाले. या ठिकाणी आता घाण पसरत असून, स्मारकाची दुरावस्था झाल्याचे दिसून येते.
कारंजात कारंजे पडले बंद !
काही वर्षांपूर्वी कारंजातील जयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. सौंदर्यीकरण करण्याच्या हेतूने आजुबाजूने पाण्याचे कारंजे उभारले गेले होते. आता हे कारंजे बंद पडले आहेत. त्यातच या स्मारकाशेजारी किरकोळ व्यावसायिक आपली दुकानेही थाटून बसत असतात. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाºया सेनानींच्या स्मरणार्थ रिसोड पंचायत समिती परिसरात स्तंभ उभारण्यात आला. या स्तंभाच्या अवतीभोवती काही झाडे, झुडपे वाढली आहेत, ही बाब उचित नाही. लवकरच यासंदर्भात कार्यवाही करून या परिसराची स्वच्छता करण्यात येईल.
- एस.व्ही. इस्कापे,
प्रभारी गटविकास अधिकारी
पंचायत समिती, रिसोड