रस्ता बांधकामात हलगर्जीपणा; शेताचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:43+5:302021-07-12T04:25:43+5:30
तालुक्यात अकोला-आर्णी, मानोरा-कारंजा, कुपटा- मंगरूळपीर या रस्त्यांची कामे मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. निर्माणाधिन राष्ट्रीय महामार्ग असो, की राज्य ...
तालुक्यात अकोला-आर्णी, मानोरा-कारंजा, कुपटा- मंगरूळपीर या रस्त्यांची कामे मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. निर्माणाधिन राष्ट्रीय महामार्ग असो, की राज्य महामार्ग, यादरम्यान रस्त्यावर काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपन्या मनमानी पद्धतीने मागील अनेक वर्षांपासून काम करीत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
धामणी-मानोरा येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी रुखमाबाई सदाशिव पाटील यांचे मानोरा-कारंजा रस्त्यावर वाटोद शिवारात शेत असून मानोरा-कारंजा रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने रस्ता निर्मितीदरम्यान नालीचे बांधकाम न केल्याने रस्त्यावरील पाण्याचा लोंढा शेतात शिरला. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तथापि, नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महिला शेतकरी पाटील यांनी केली आहे.
............
हजारो रुपयांचा खर्च ठरला व्यर्थ
वाटोद येथील महिला शेतकरी रुखमाबाई पाटील यांनी यंदाच्या खरीप हंगामात आर्थिक चणचण जाणवत असतानाही महागडी बी-बियाणे व खते आणून पेरणी केली. मध्यंतरीच्या पावसाने पिके चांगली बहरली होती; मात्र अशातच रस्त्यावरील पाणी शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला.