वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्भवतींची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:20 PM2019-10-30T13:20:22+5:302019-10-30T13:20:31+5:30
गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असतांना सुध्दा कर्तव्यावर तैनात असलेल्या डॉक्टर, परिचारिकांनी त्या महिलेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.
- शिखरचंद बागरेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृतीसाठी दाखल झालेल्या गर्भवत महिलांची प्रचंड हेळसांड होत आहे. प्रसुतीसाठी आलेल्या तीन गर्भवतींकडे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांना खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागल्याचा प्रकार २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी घडला. यातील एका महिलेची खासगी दवाखान्यात प्रसुती झाली, तर इतर दोघींबाबत माहिती मिळू शकली नाही.
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारीवर्ग रुग्णांना योग्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करण्याबाबत उदासीन असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. अपघातातील गंभीर जखमी, गर्भवती महिलांसह इतर रुग्णांबाबत हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यातच सोमवार २८ आॅक्टोंबर रोजी गर्भवती महिलांच्या बाबतीत असाच प्रकार पुन्हा येथे घडला. मंगरुळपीर येथील रहिवासी गर्भवती महिला शितल राजू मापारी हिला तिच्या नातेवाईकांनी सोमवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते. सदर गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असताना सुध्दा कर्तव्यावर तैनात असलेल्या डॉक्टर, परिचारिकांनी त्या महिलेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. प्रसव कळांनी त्रस्त झालेल्या शितल मापारी हिला अकोला किंवा बाहेर खाजगी रुग्णालयात नण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांना देऊन त्यांना ताबडतोब बाहेर जाण्याचा दमही त्यांनी भरला. परिणामी मापारी कुटूंबाने गर्भवती महिलेस बाहेर खाजगी रुग्णालयात नेण्याची तयारी करुन रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र दोन तासापर्यंत प्रतिक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर त्यांनी गर्भवतीस आॅटोरिक्षाने वाशिम येथील खाजगी रुग्णालयात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाखल केले. सदर गर्भवती महिलेची रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रसुती झाली. अशीच वागणूक याच दिवशी इतर दोन गर्भवती महिलांनाही येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनाही अकोला येथे किंवा शहरातील खाजगी रुगणालयात जाण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती मिळाली आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाºयांनी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी संबंधित महिला रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
सदर गंभीर प्रकाराची आपण चौकशी करू. सोमवार २८ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील संबंधित कक्षात कर्तव्यावर कोण होते, याचीही चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाºयावर कारवाई करण्यात येईल.
- अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकीत्सक वाशिम
सकाळपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतरही सायंकाळपर्यंत माझ्याकडे कोणत्याही अधिकारी, परिचारीका व कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही. मला प्रसवकळा होत असतानाही उपचाराऐवजी अपमानास्पद वागणूक देऊन खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसतानाही नातेवाईकांनी कर्ज काढून मला खाजगी रुगणालयात दाखल केले.
-शितल राजू मापारी
गर्भवती रु ग्ण, मंगरुळपीर