शालेय आरोग्य तपासणीबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:35 PM2018-08-06T13:35:41+5:302018-08-06T13:37:51+5:30
कारंजा आणि मानोरा तालुक्यातील अनेक शाळांत अद्यापही तपासणी पथक पोहोचलेच नसल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांत आरोग्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येते; परंतु शालेय सत्राला दीड महिना उलटला तरी, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील अनेक शाळांत अद्यापही तपासणी पथक पोहोचलेच नसल्याची माहिती आहे. यामुळे आरोग्य विभाग शालेय तपासणीबाबत फारसा गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात २ वैदयकीय अधिकारी, १ आरोग्य सेविका व १ औषध निमार्ता यांचा समावेश आहे. या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच महिन्यापासून ही मोहिम राबविण्यास सुरुवात होते. पथकाकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल तयार करण्यात येतो आणि त्या अहवालानुसार गंभीर आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येतात. विद्यार्थ्याचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी ही मोहिम राबविण्यात येते. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील बहुतांश शाळांत अद्यापही शालेय तपासणीसाठी आरोग्य पथकच पोहोचले नाही. दरम्यान, या संदर्भात तालुका आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.