शेजारधर्म...कर्करोगग्रस्त युवकाच्या मदतीसाठी शेजाऱ्याने ठेवली शेती गहाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:23 PM2020-09-27T12:23:37+5:302020-09-27T12:27:20+5:30
जातीपातीपलीकडचे नाते जपत देशमुख दाम्पत्याने शेजारधर्म पाळून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.
- बबन देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : शेजारधर्म कसा असावा, याचा आदर्श नमुना कारखेडा येथील देशमुख दाम्पत्याने इतरांसमोर ठेवला आहे. शेजारच्या कर्करोगग्रस्त युवकाला उपचारासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून देण्याकरीता याच दाम्पत्याने बँकेकडे शेती गहाण ठेवून दीड लाख रुपयांची मदत केली.
कारखेडा येथील एका युवकाच्या मुखामध्ये छोटीशी गाठ आल्याने मानोरा, वाशिमसह अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. उपचाराअंती त्याला कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोग हा गंभीर स्वरुप धारण करण्यापूर्वी तातडीने उपचार करावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला. परिस्थिती हलाखीची असल्याने आणि जवळचा पैसा यापूर्वीच्या उपचारावर खर्च झाल्याने आता उपचारासाठी पैशाची जुळवाजूळव कशी करावी, याची चिंता त्या युवकाच्या आई-वडीलांना लागली. अनेकांकडे पैशाची मागणी केली; परंतू, पदरी निराशा पडल्याने मुलाच्या कर्करोगावर उपचार होणार की नाहीत, या प्रश्नाने आई-वडीलांची झोप उडाली. ही बाब शेजारी राहणारे बाळासाहेब शंकरराव देशमुख व पुष्पाताई बाळासाहेब देशमुख या शेतकरी दाम्पत्याला समजताच, काही काळजी करू नका, पैशाची तरतूद करतो, असे म्हणत आजारी युवकासह कुटुंबियांना धीर दिला.
शेतीचा खर्च आटोपता घेत शेतीवर पीक कर्ज काढले व त्या युवकाला नागपुर येथे उपचार करण्याकरिता दिड लाख रूपयाची मदत केली. शासनाकडून मिळणाºया सवलती आणि हे दीड लाख रुपये यामुळे त्या युवकाचे प्राण वाचले. जातीपातीपलीकडचे नाते जपत देशमुख दाम्पत्याने शेजारधर्म पाळून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.