संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत धूळखात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:04 PM2018-02-01T14:04:04+5:302018-02-01T14:05:21+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : केवळ संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची सुसज्ज इमारत गत काही वर्षांपासून धूळ खात आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध नसल्याने भाड्याच्या इमारतीतूनच दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.
शिरपूर जैन (वाशिम) : केवळ संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची सुसज्ज इमारत गत काही वर्षांपासून धूळ खात आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध नसल्याने भाड्याच्या इमारतीतूनच दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.
मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथे आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने सुरूवातीपासूनच दुय्यम निबंधक कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. इमारत बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी तत्कालिन इमारत दिवंगत सुभाषराव झनक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सन २०१२ मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरूवात झाली होती. सन २०१६-१७ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र निधीअभावी संरक्षण भिंतीचे काम होऊ शकले नाही. तेव्हापासून सदर इमारत जैसे थे आहे. संरक्षण भिंत नसल्याने या इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत होऊ शकले नाही. दोन बाजूचे संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यासाठी निधीची गरज आहे. निधी कधी मिळणार आणि या इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत कधी होणार? याकडे शिरपूरसह मालेगाव तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.
सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे, अशा सूचना अधीक्षकांना दिलेल्या आहेत. संरक्षण भिंतीसाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्याची सूचनाही संबंधितांना दिली आहे. हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविल्यानंतर शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल.
- अमित झनक, आमदार
रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ.