ग्रामीण भागात अचूक माहिती पोहचविण्यासाठी वृत्तपत्र वितरकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:28 PM2020-03-24T14:28:10+5:302020-03-24T14:28:44+5:30
वृत्तपत्र वितरक सायकलने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे धनज बु. परिसरात मंगळवारी सकाळी दिसले.
- अंकुश कथे
धनज बु. (वाशिम) : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पृष्ठभुमीवर राज्यशासनाने जिवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदी घातली आहे. त्यात ग्रामीण भागातील बससेवाही बंद करण्यात आली आहे. अशाही स्थितीत देशभरातील घटना, घडामोडींची अचूक माहिती ग्रामीण भागांत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र वितरक सायकलने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे धनज बु. परिसरात मंगळवारी सकाळी दिसले.
कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात वाढतच आहे. महाराष्ट्रातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शासनाने कठोर पावले उचलताना सोमवारी सायंकाळपासूनच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले. तर पूर्वीच बससेवाही बंद झालेली आहे. या परिस्थितीत सोशल मिडियावर चुकीची माहिती आणि अफवार पसरविल्या जात आहेत. अशात ग्रामीण भागांतील लोकांचे मनोधैर्य खचू नये त्यांना शाश्वत माहिती मिळावी आणि त्यांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणून कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांतील वृत्तपत्र वितरण करणारे धडपड करीत आहेत. बससेवा बंद असतानाही ही मंडळी सायकलने कारंजा येथे जाऊन वृत्तपत्र आणत गावांत त्याचे वितरण करीत असल्याचे चित्र मंगळवारी सकाळी दिसून आले.