एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामबंद आंदोलन; वाशिम जिल्ह्यातील ३६४ कर्मचारी आंदोलनात सहभागी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:41 PM2018-05-08T14:41:35+5:302018-05-08T14:41:35+5:30
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासनस्तरावर बेदखल ठरल्यामुळे राज्यभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन पुकारले आहे.
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासनस्तरावर बेदखल ठरल्यामुळे राज्यभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाशिम जिल्ह्यातील ३६४ अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष महेंद्र साबळे यांनी दिली.
आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्रिस्तरीय समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय अद्याप निघालेला नाही, संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांचा निमंत्रित सदस्य म्हणून त्यात सहभाग व्हावा, ही मागणी अपूर्ण आहे. प्रथम सभा घेवून त्यात एन.एच.एम. अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाºयांच्या समायोजनाच्या दृृष्टीने पुढील पदभरती (आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभाग) थांबविण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच समिती स्थापनेपासून तीन महिन्याच्या कालावधीत एन.एच.एम.अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या आर.आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल, हे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकवेळ कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले असून या आंदोलनास ८ मे पासून प्रारंभ झाला. याअंतर्गत जिल्हा परिषदेसमोर पेन्डॉल टाकून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला.
जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांना दिल्या जाणार घुगऱ्या!
आंदोलनाचा एक भाग म्हणून ९ मे रोजी जिल्हा परिषदेसमोरील पेन्डॉलमध्ये चूलीवर घुगऱ्या शिजवून त्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत प्रत्येक विभागप्रमुखांना दिल्या जाणार आहेत. यामाध्यमातून शासनाच्या धोरणांप्रती संताप व्यक्त केला जाणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष साबळे यांनी दिली.