राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नऊ गोदामांना मंजुरी
By admin | Published: February 19, 2017 02:04 AM2017-02-19T02:04:39+5:302017-02-19T02:04:39+5:30
कृषी अधिका-यांची माहिती; ५0 टक्के अनुदान म्हणून १२ लाख ५0 हजार रुपये खात्यात जमा.
वाशिम, दि. १८- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तसेच राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड अभियान मिळून कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात १२ गोदामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी नऊ गोदामांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर उर्वरित गोदामांचे अनुदान संबंधितांनी नाकारले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि गळीत धान्य, तेलताड अभियानांतर्गत कृषी विभागाच्यावतीने गोदामांसाठी बँक कर्जावर आधारित ५0 टक्के अनुदानाची गोदाम बांधकाम योजना राबविण्यात येते. या योजनेंसाठी ५0 टक्के अनुदानावर २५ लाख रुपये किमतीच्या गोदामाला मंजुरी देण्यात येते. यातील ५0 टक्के रक्कम ही बँक कर्जावर आधारित असल्याने बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या हिश्शाचा समावेश केला जातो. बँकेच्या कर्जमंजुरी पत्रानंतरच गोदामाला कृषी विभाग मंजुरी देते. योजनेच्या निकषानुसार कमाल २५0 मेट्रिक टन शेतमाल साठवणुकीची क्षमता असलेल्या गोदामासाठी लाभाथीर्ंना जागेची निवड करावी लागते. लाभार्थीसाठी विशेष जटील निकष नसले तरी, यामध्ये महिला, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांना प्राधान्य, गावाची जमीन आरोग्य पत्रिका असावी, ३0 टक्के महिलांना प्राधान्य, शेतकरी मासिक वर्गणीधारक होणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ सक्षम शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, वैयक्तिक शेतकरी इत्यादींना देण्यात येतो. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १२ अर्ज प्राप्त झाले होते. या सर्वच अर्जांंना कृषी विभागाच्यावतीने मंजुरी देऊन बँक कर्ज तत्त्वावर नऊ अर्जदारांनी आपल्या गोदामांच्या कामाला सुरुवात केली आहे.
या अंतर्गत कृषी विभागाच्यावतीने संबंधितांना ५0 टक्के अनुदान म्हणून १२ लाख ५0 हजार रुपये खात्यात जमा केले आहेत. या योजनेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद असल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेला वाढता प्रतिसाद असल्यामुळे याबाबत कृषी विभाग अधिक सक्रिय आहे. या योजनेची माहिती घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांशी संपर्क साधावा लागतो.