वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गासाठी नितिन गडकरींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:51 PM2018-04-24T13:51:48+5:302018-04-24T13:51:48+5:30
मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे घातले आहे.
मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे घातले आहे. माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासह काही बड्यानेत्यांनी याबाबत नागपूर येथे गडकरी यांची भेट घेतली आहे.
वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता यावा, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने गेल्या १५ ते २० वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करीत आहे. त्याबाबत दोन वेळा केंद्रीय स्तरावरून सदर मार्गासाठी सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु त्यापुढे काहीच झाले नाही. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग झाल्यास वाशिम जिल्हा हा देशाच्या उत्तर-दक्षिण दिशेने देशात जोडला जाईल आणि जिल्ह्यातील शेतकºयांना देशाच्या बाजारपेठा उपलब्ध होतील, तसेच जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक, कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मंदीर, बालाजी देवस्थान, पर्यटकीयदृष्ट्या विकसित होऊन ही दोन्ही शहरे जंक्शन बनतील व बडनेरा, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम येथील औद्योगिक वसाहती, बाजार समित्या, गॅस प्रकल्प, मुख्य बाजार प्रगत होऊन औद्योगिक विकासाबरोबरच, रोजगाराची साधने उपलब्ध होतील, भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या मार्गाचा उपयोग होण्याबरोबरच नवी बंगळुरू-दिल्ली हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येऊन प्रवासाचे तास, अंतर व खर्चात बचत होईल, असे मुद्दे केंद्रीय मंत्री गडकरी यांना त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर भेट घेऊन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे आणि माजी आमदार विजयराव जाधव यांनी पटवून दिले. त्यावरून गडकरी यांनी या मार्गासाठी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेमंत्रालयास निर्देश दिले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातील अडथळा दूर होऊन कामास गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेही वसंतराव पाटील शेगीकर, रमेशचंद्र नावंधर, धनंजय रणखांब, मारोतराव लादे, धनंजय घुगे, नितेश राठी, भिमकुमार जिवनाणी, शिवशंकर भोयर, दिलिप जोशी, सत्यानंद कांबळे, गिरधारी तोष्णीवाल व प्रा. अरू णकुमार इंगळे हे उपस्थित होते.