‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीचा तिढा सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:17 AM2017-08-02T02:17:28+5:302017-08-02T02:17:56+5:30

वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सन २00९ पासून एकही रुपया शिष्यवृत्ती मिळाली नव्हती.

NMMS scholarship cleared! | ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीचा तिढा सुटला!

‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीचा तिढा सुटला!

Next
ठळक मुद्देशासनाकडून दखल विद्यार्थ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने रक्कम जमा२0१0-२0११ मधील रक्कम अद्याप प्रलंबित!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सन २00९ पासून एकही रुपया शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. दरम्यान, विविध वृत्तांच्या माध्यमातून ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा यामुळे यशस्वी झाला असून केंद्रशासनाने शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम मंजूर केली असून ती टप्प्याटप्प्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.
२00७-0८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेतली जाते. या परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५00 रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, २00९ पासून २0१६ पर्यंतच्या कालावधीत दरवर्षी झालेल्या परिक्षेत वाशिम जिल्ह्यातील एकंदरित ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण होवून शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र ठरले. त्यापैकी २0१0 आणि २0११ या दोन वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम वगळून उर्वरित ५८३ विद्यार्थ्यांच्या खात्यात चालू आठवड्यापाूसन टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यास वाशिमच्या माध्यमिक शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे.
तथापि, ‘लोकमत’ने विविध वृत्तांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या प्रलंबित रकमेचे प्रकरण उजागर केले. त्याची दखल घेवून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शिक्षण विभाग, एनसीईआरटी (नवी दिल्ली) कडे पत्रव्यवहार केला. यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे अखेर शिष्यवृत्तीस पात्र जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असून संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

२0१0-२0११ मधील रक्कम अद्याप प्रलंबित!
२0१0 आणि २0११ या दोन वर्षांत एकूण २६८ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाले होता. मात्र, हा अहवाल शासनाकडे निर्धारित मुदतीत सादर करण्यात वाशिमचे तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी विश्‍वास लबडे यांनी हयगय केली. त्यामुळे देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपयाची रक्कम अद्याप प्रलंबित असून ती शासनाने मंजूर केलेली नाही. याऊलट सदर रक्कम लबडे यांच्याकडूनच वसूल करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. 

सन २00९ पासून शासनाकडे प्रलंबित असलेली ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परिक्षेची प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांंच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया थेट केंद्रशासनस्तरावरून होत असल्याने आतापर्यंत किती विद्यार्थ्यांंना लाभ मिळाला, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही.
- ललित भुरे
समन्वयक, एनएमएमएस परिक्षा, 
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, वाशिम
 

Web Title: NMMS scholarship cleared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.