ना रक्त तपासणी, ना सोनोग्राफी; पाच टक्के महिला थेट प्रसुतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:55 AM2021-06-23T11:55:08+5:302021-06-23T11:55:28+5:30

Washim News : गर्भवती महिलांची नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी झाल्यास व्यंग बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी करता येते.

No blood tests, no sonography; Five percent of women live for direct delivery | ना रक्त तपासणी, ना सोनोग्राफी; पाच टक्के महिला थेट प्रसुतीसाठी

ना रक्त तपासणी, ना सोनोग्राफी; पाच टक्के महिला थेट प्रसुतीसाठी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुदृढ बाळ सुलभरित्या जन्माला यावे, याकरिता गर्भवती महिलांनी नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील काही गर्भवती महिला प्रसुतीसाठी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असल्याने यावेळी विविध तपासण्यांसाठी एकच धावपळ उडते. वर्षभरात जवळपास ५ टक्के महिला थेट प्रसुतीसाठी दाखल झाल्या.
प्रसुतीपूर्वी गर्भवती महिलांची नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी झाल्यास व्यंग बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी करता येते. ग्रामीण भागातील काही महिलांची गरोदरपणात नियमित तपासणी होत नाही. कोरोनाकाळात तर त्यात आणखी भर पडली. गर्भधारणेपासून जन्मापर्यंत काही शारीरिक व्याधी व आजाराची शक्यता असल्यास त्याची माहिती नियमित तपासण्यांद्वारे बऱ्याच प्रमाणात मिळते. प्रत्येक गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात आरोग्य सुविधा, प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत मोफत उपलब्ध आहेत. परंतु तरीही ग्रामीण भागातील काही गरोदर महिला एकदाही रक्त तपासणी, सोनोग्राफी करत नाहीत. 
थेट प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असल्याची स्थिती गत वर्षभरात दिसून आली. अशावेळी अनेकदा प्रसुतीदरम्यान, गर्भात गुंतागुंत अवस्था समोर येते. त्यातून अनेकदा मातेसह शिशूच्या जीवाला धोका निर्माण होतो, तर व्यंगासह आयुष्य काढण्याची वेळ शिशूवर येते.
 गरोदरपणातील गुंतागुंत आणि गर्भातील शिशूत असलेले व्यंग वेळीच समोर येण्यासाठी नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी व्हावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
 

चाचणी आवश्यक
गर्भातील बाळाची अवस्था काय, काही व्यंग तर नाही ना, वाढीची अवस्था, गरोदर मातेला काही आजार, तर नाही ना, याची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी रक्ताच्या विविध चाचण्या तसेच सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात रक्त चाचणी, सोनोग्राफीची सुविधा मोफत उपलब्ध आहे. सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलांनी नियमित रक्त चाचणी व सोनोग्राफी करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.


शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी जिल्हा सामान्य रुग्णालयासह सरकारी दवाखान्यांत मोफत केली जाते. शहरी भागातील जवळपास सर्वच गर्भवती महिला नियमित तपासणी, सोनोग्राफी करतात. ग्रामीण भागातील काही महिला मात्र थेट प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. ग्रामीण भागातील महिलांनीदेखील नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी करायला हवी. यामुळे गर्भातील शिशूत काही व्यंग असेल तर निदर्शनास येऊ शकते.
- डॉ. शेख आसिफ हुसेन
स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

Web Title: No blood tests, no sonography; Five percent of women live for direct delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.