१७ महिन्यातही झाली नाही त्रुटींची पुर्तता; कंत्राटदाराची हलगर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:03 PM2019-12-30T14:03:38+5:302019-12-30T14:03:47+5:30
१०० खाटांचे प्रशस्त स्त्री रुग्णालय उभारण्यात आले; मात्र विविध स्वरूपातील १९ त्रुटींची पुर्तता १७ महिन्यातही झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील महिलांना आरोग्यविषयक सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, या उद्देशाने १०० खाटांचे प्रशस्त स्त्री रुग्णालय उभारण्यात आले; मात्र विविध स्वरूपातील १९ त्रुटींची पुर्तता १७ महिन्यातही झाली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने इमारत ताब्यात घेण्यास नकार दर्शविला आहे. परिणामी, स्त्री रुग्णालयाच्या लोकार्पणाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे.
वाशिम शहरातील नालंदा नगर परिसरात १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाची भव्यदिव्य इमारत उभी झाली. सदर इमारतीचे हस्तांतरण करून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांच्यासहन वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ. बालाजी हरण यांनी २८ जून २०१८ रोजी इमारतीची पाहणी केली. त्यात संरक्षक भिंतीमधील अपूर्ण स्पॅनचे बांधकाम, रंगरंगोटी, वॉटर कुलरचे सप्लाय पाईप कनेक्शन, इमारतीच्या दरवाजाला लावलेले स्टीलचे डोअरकीट नवीन बसविणे, सर्व व्हेंटीलेटरला आॅईल पेंटींग करणे, एन.आय.सी.यू. वॉर्डच्या कॉलममधील टाईल्सची दुरूस्ती करणे, लिप्ट वेलच्या दरवाजाला तात्पुरते प्लायवूडने बंद करणे, लेबर रुममधील टाईल्सच्या जॉईन्टची फिनीशींग करणे, एन.आय.सी.यू., आय.सी.यू., लेबर रुम आणि ओ.टी. रुममधील स्क्रबकरिता एल्बो टॅप लावणे, इमारतीच्या वेटींग हॉलमध्ये ग्रेनाईट सिटींग प्लॅटफॉर्मची व्यवस्था करणे, आॅपरेशन कक्षाच्या वेटींगमधील वॉलच्या ग्रेनाईटमधील गॅपमध्ये फिलींग करणे, औषध स्पेस ओटीएसकडे जाणाऱ्या पायऱ्यांमधील जॉईन्ट फिलींग करणे, रॅम्पच्या तळमजलाकडील जागेची फिनीशींग करणे व दरवाजाची दुरूस्ती करणे, मीटर रुमच्या आतील फिनीशींग करणे, इमारतीसाठी फ्लॅग पोष्टकरिता पोल लावणे व पाण्याचा निचरा घेण्याकरिता टाईल्स फिनीशींग करणे, मल:निसारणामधील इन्स्पेक्शन चेंबरच्या आतील भागाची फिनीशिंग करणे, सेप्टीक टँकवरील सी.सी. कव्हर लावणे, इमारतीच्या प्रवेशव्दारानजिक रॅम्पच्या टाईल्सची फिनीशिंग करणे, संपूर्ण इमारतीच्या अंतर्गत व बाह्य रंगरंगोटीला फिनीशिंग करणे आदी १९ मुद्दे तत्काळ निकाली काढावे, यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे काम करणाºया सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे ५ जुलै २०१८ रोजी पत्रव्यवहार केला; मात्र १७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही त्रुट्या दूर झालेल्या नाहीत. यामुळे आरोग्य विभागाने इमारत हस्तांतरित करून घेण्यास नकार दिल्याने हा प्रश्न ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.
स्त्री रुग्णालयाच्या इमारत बांधकामात विविध स्वरूपातील १९ त्रुट्या आढळल्या आहेत. त्या जोपर्यंत दूर होत नाहीत, तोपर्यंत इमारत हस्तांतरित करून घेता येणार नाही. बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम