गावतलावांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीच मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:11 PM2020-09-13T12:11:58+5:302020-09-13T12:12:08+5:30
१०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत जवळपास ४५० जलसाठ्याचे प्रकल्प असून, यापैकी १०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही. मार्च २०२० मध्ये पाठविलेला २९.९९ कोटींचा निधी प्रस्तावही शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी कवठळ परिसरातील दोन गाव फुटल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेतर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले.
जि.प.जलसंधारण विभागांतर्गत गावतलाव, कोल्हापूरी बंधारे, लघु प्रकल्प आदी प्रकारातील जवळपास ४५० जलसाठे प्रकल्प आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे तलाव फुटून नुकसान होऊ नये म्हणून उन्हाळयातच आवश्यक त्या तलावांची देखभाल, दुरूस्ती होणे आवश्यक आहे. प्रकल्पाची आयुर्मर्यादा साधारणत: ५० वर्षांची असते. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण आणि इतर १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा निधी आवश्यक असून, तसा प्रस्तावही जि.प. प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शासनाकडे पाठविला. सध्या हा प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. जिल्ह्यात १० आॅगस्ट रोजी कवठळ परिसरातील दोन गावतलाव फुटल्याने संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी निधी प्रस्ताव निकाली निघणे आवश्यक आहे.
कवठळ परिसरात पंचनामे सुरू
मंगरूळपीर : तालुक्यातील कवठळ येथे १० आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे दोन गावतलाव फुटल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १२ सप्टेंबरपासून प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त शेतजमिनीच्या पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही तलाव हे २८ वर्षे जुने असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पिकांचे नुकसान झाले तसेच जमीनीसुद्धा खरडून गेल्याने रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.
वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण व इतर १०५ कामांसाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे यापूर्वीच सादर केला.
- ए.एम. खान
जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प.