रेल्वेप्रवास नको रे बाबा; वाशिम रेल्वेस्थानकात सर्वत्र शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:52 PM2021-04-22T12:52:06+5:302021-04-22T12:53:01+5:30
Washim railway station : ५० ते ६० प्रवाशी वाशिम स्थानकावरून रेल्वेत बसत असून, आगामी आरक्षित तिकिटही रद्द केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशात सर्वत्रच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवाशीदेखील खबरदारी घेत असल्याचे वाशिम रेल्वे स्थानकावर दिसून आले. दैनंदिन केवळ ५० ते ६० प्रवाशी वाशिम स्थानकावरून रेल्वेत बसत असून, आगामी आरक्षित तिकिटही रद्द केले जात आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या दरम्यान वाशिम येथून धावणाºया रेल्वेही बंद होत्या. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विशेष रेल्वे गाड्या वाशिममार्गे सुरू झाल्या. सध्या एकूण १५ रेल्वेगाड्या वाशिममार्गे धावत असून, यामध्ये पॅसेंजर गाड्यांचा समावेश नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने प्रवाशांनी नियोजित प्रवास लांबणीवर टाकल्याचे दिसून येते. आरक्षण रद्द करण्याकडे अनेकांचा कल असून, वाशिम येथील स्थानकावरून दैनंदिन सरासरी ५० ते ६० प्रवाशी रेल्वेत बसत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवाशीदेखील खबरदारीचा प्रयत्न म्हणून घरातच राहण्याला पसंती देत आहेत.
इंटरसिटी एक्सप्रेसलाही गर्दी कमीच
अकोला-काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये एरव्ही सर्वाधिक गर्दी असते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरदेखील या रेल्वेत फारशी प्रवाशी संख्या नव्हती. मध्यंतरी प्रवाशी मिळत नसल्याने इंटरसिटी एक्सप्रेस काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाच्या दुसºया लाटेतही इंटरसिटी एक्सप्रेस सुरू असली तरी प्रवाशांची गर्दी नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव म्हणून अनेकजण प्रवास टाळत आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्यादेखील कमी झाली आहे. रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात येते. परंतू, पूर्वीच्या तुलनेत आता प्रवाशी संख्या कमी झाल्याने रेल्वे स्थानक येथे गर्दी दिसून येत नाही.
एम.टी. उजवे
रेल्वेस्थानक प्रमुख, वाशिम.