वाशिम शहरात बालकांसाठीचे ऑक्सिजन मास्क मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:59 AM2021-05-25T11:59:06+5:302021-05-25T11:59:13+5:30
pediatric oxygen mask : सर्वच औषधी दुकाने शाेधूनही मिळत नसल्याने पालकांची चांगलीच धावपळ हाेत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : काेराेनासह इतर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना लागणारे ऑक्सिजन मास्क शहरातील सर्वच औषधी दुकाने शाेधूनही मिळत नसल्याने पालकांची चांगलीच धावपळ हाेत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे काेराेना संसर्गाची तिसरी लाट लहान मुलांसाठी असल्याचा अंदाज आराेग्य विभागातर्फे वर्तविला जात आहे. याकरिता शहरातील बालराेग तज्ज्ञ सरसावले असून, ॲक्शन प्लॅनसुद्धा तयार करण्यात येत आहे. शहरातील बालराेग तज्ज्ञांचा हा स्तुत्य उपक्रम असल्याची चर्चा हाेत आहे.
परंतु, खासगी दवाखान्यामध्ये दाखल असलेल्या व ऑक्सिजनची गरज असलेल्या बालकांसाठी असलेले ऑक्सिजन मास्क (पिड्रॅटिक्स मास्क) हे शहरात कुठेच उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव डाॅक्टर सर्वांना लागत असलेले ऑक्सिजन मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. या मास्कमधून पाहिजे त्या प्रमाणात बालकांना ऑक्सिजन पुरवठा हाेताना दिसून येत नाही.
इतर मास्कच्या तुलनेत पिड्रॅटिक्स मास्क महागडे
सर्वसामान्य रुग्णांना लागणाऱ्या मास्कच्या तुलनेत पिड्रॅटिक्स माक्स महागडे असल्याने डाॅक्टर मंडळी या मास्कला पसंती देत नसल्याचे औषधी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे हे मास्क ऑर्डर केले जात नसल्याचे एका औषधी विक्रेत्यांनी सांगितले. ऑक्सिजन मास्क १०० रुपयांपर्यंत मिळत असून, लहान बालकांना लागणारे मास्क मात्र ४५० रुपयांपर्यंत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्णांचे नातेवाईक घेऊन येत असलेले प्रिस्क्रिप्शनवर ऑक्सिजन मास्क असे लिहून दिले जाते. विशेष लहान मुलांकरिताचे ऑक्सिजन मास्क काेणी मागत नसल्याने ठेवण्यात येत नाही. मागणी नसल्याने शहरातील बहुतांश औषधी विक्रेते हे मास्क ठेवत नाहीत.
- हुकूम तुर्के
औषधी विक्रेता, वाशिम
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभाग प्रयत्नशील आहे. तिसरी लाट लहान मुलांवर असल्याचे संकेत आहेत. त्यानुसार नियाेजन केले जात आहे. लहान मुलांना लागणाऱ्या ऑक्सिजन मास्कसह इतरही उपाय याेजना केल्या जातीत.
- डाॅ. मधुकर राठाेड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम