१५ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही; तर यादीतून नाव वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:54+5:302021-03-27T04:42:54+5:30
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र गोळा करण्यासाठी सदर यादी संबंधित मतदान केंद्र, नगर परिषद, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी, मंडळ ...
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र गोळा करण्यासाठी सदर यादी संबंधित मतदान केंद्र, नगर परिषद, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती कार्यालयांमध्ये अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-बीएलओ, सहायक शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशा आदींकडून मतदारांचे छायाचित्र गोळा करणे सुरू आहे. दरम्यान, १५ मार्च २०२१ पर्यंतची मुदत त्यासाठी देण्यात आली होती. विहित मुदतीत मतदारांनी छायाचित्र जमा न केल्यास संबंधित मतदार मतदान केंद्र क्षेत्रातील रहिवासी नाहीत, असे गृहीत धरून लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम २२ नुसार मतदार यादीतून अशी नावे वगळण्यात येतील, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील १५ हजारांपेक्षा अधिक मतदारांनी वारंवार आवाहन करूनही छायाचित्र जमा केलेले नाही. त्यामुळे संबंधितांची नावे आता मतदार यादीतून वगळली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
......................
विधानसभानिहाय मतदारांची आकडेवारी अशी
विधानसभा मतदारसंघ - वाशिम-मंगरूळपीर
एकूण मतदार - ३,४८,७४९
छायाचित्र नसलेले मतदार - ८,९६२
विधानसभा मतदारसंघ - रिसोड-मालेगाव
एकूण मतदार - ३,०८,३७८
छायाचित्र नसलेले मतदार - ५,६३८
विधानसभा मतदारसंघ - कारंजा-मानोरा
एकूण मतदार - ३,०१,८७२
छायाचित्र नसलेले मतदार - ८४३
...............
जिल्ह्यातील मतदार
९,५८,५५१
..........
छायाचित्र नसलेले मतदार
१५,४४३
.............
विधानसभानिहाय मतदार याद्यांमध्ये ज्या मतदारांची छायाचित्रे नाहीत, त्यांनी ती १५ मार्चपर्यंत प्रशासनाकडे जमा करावीत, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-बीएलओ, सहायक शिक्षक, अंगणवाडी सेविकांना याकामी नियुक्त करण्यात आले; मात्र अधिकांश मतदारांनी या प्रक्रियेस सहकार्य केलेले नाही. त्यांची नावे आता मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे.
- सुनील विंचनकर
निवडणूक अधिकारी, वाशिम