शिरपूर उपबाजारात प्लेट काटा नाही, व्यापारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:03+5:302021-07-29T04:41:03+5:30
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शिरपूर जैन येथे उपबाजार केंद्र आहे. या उपबाजार केंद्रात शिरपूर, वसारी, तिवळी, करंजी, ढोरखेडा, ...
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शिरपूर जैन येथे उपबाजार केंद्र आहे. या उपबाजार केंद्रात शिरपूर, वसारी, तिवळी, करंजी, ढोरखेडा, बोराळा दापुरी, येवता, कोठा, पांगरखेडा, घाटा, मिर्झापूर,एकांबा, किन्ही घोडमोड, शेलगाव खवणे, शेलगाव बगाडे, शेलगाव बोंदाडे, वाघळुद, दापुरीसह विविध गावांचे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात. दररोज शेकडो क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे व्यापाऱ्यांकडून तत्काळ रोखीने केले जातात. वर्षाकाठी शिरपूर उपबाजारात साठ ते सत्तर लाख रुपयांचे उत्पन्न मालेगाव बाजार समितीला होते. मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने तो शेतमाल व्यापाऱ्यांना विक्रीसाठी बाहेर ठिकाणी पाठवावा लागतो. त्याअगोदर वाहनासह शेतमालाचे वजन करावे लागते. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारा प्लेट काटा मागील कित्येक वर्षांपासून उपलब्ध करण्यात आला नाही. परिणामी गाडी व मालाचे मोजमाप मालेगाव येथे प्लेट काट्यावर करावे लागते. याचा व्यापाऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पन्न असलेल्या शिरपूर उपबाजारात प्लेट काटा नसणे, हे विद्यमान संचालकांसाठी अशोभनीय आहे. तसेच व्यापारीवर्गासाठी त्रासदायक आहे. त्यामुळे शिरपूर उपबाजारात तत्काळ प्लेट काटा उपलब्ध करून द्यावा, याविषयी निबंधक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
संतोष भालेराव. अध्यक्ष व्यापारी संघटना, शिरपूर जैन.
शिरपूर उपबाजारात प्लेट काटा बसविण्यासाठी ठराव घेण्यात आला आहे. अंदाजपत्रक तयार करून त्याविषयी प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली जाईल.
दिलीप वाझुळकर.
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगाव.