ठरावांची अंमलबजावणीच नाही!
By admin | Published: March 23, 2017 02:12 AM2017-03-23T02:12:17+5:302017-03-23T02:12:17+5:30
मानोरा नगर पंचायतने घेतलेल्या ठरावानुसार अंमलबजावणी होत नसल्याने शहराचा विकास खोळंबत आहे.
वाशिम, दि. २२- मानोरा नगर पंचायतने घेतलेल्या ठरावानुसार अंमलबजावणी होत नसल्याने शहराचा विकास खोळंबत आहे. ठरावांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नगर पंचायतच्या पदाधिकार्यांनी बुधवारी नगर विकास विभागाकडे केली.
मानोरा नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत; परंतु अद्यापपर्यंंत मंजूर ठरावाप्रमाणे विकासात्मक कामांची अंमलबजावणी नगर पंचायत प्रशासनाने केली नाही. ११ कोटी रुपयांचा निधी नगर पंचायतच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा नाही. परिणामी, ११ कोटी रुपयांच्या व्याजाच्या रकमेपासून नगर पंचायतला मुकावे लागत आहे. शहरातील विकास कामे बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. न.पं. च्या सर्वसाधारण सभेमध्ये पदाधिकार्यांकडून विकासात्मक ठराव मंजूर होतात; परंतु प्रशासनाकडून अंमलबजावणी नसल्याने शहराचा विकास खुंटला असल्याचा आरोप पदाधिकार्यांनी केला.
मानोरा शहराच्या विकासासाठी जवळपास ११ कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त आहे; मात्र अद्यापही नगर पंचायतच्या बँक खात्यात वळता करण्यात आला नाही. नगर पंचायतने शहर विकासासाठी व जनतेच्या भावना लक्षात घेऊन अनेक ठराव घेतले; मात्र अंमलबजावणी करणार्या यंत्रणेकडे कार्यतत्परता नसल्याने पेच निर्माण होत आहे. ठरावांची अंमलबजावणी का होत नाही, याचा जाब विचारला जाईल.
- रेखा पाचडे
नगराध्यक्ष, मानोरा नगर पंचायत.