ना शाळा, ना परीक्षा; तरीही जिल्ह्यातील २.४३ लाख विद्यार्थी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:02 PM2021-06-22T12:02:45+5:302021-06-22T12:02:54+5:30
Education Sector News : कोरोनामुळे परीक्षा न घेताच, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे परीक्षा न घेताच, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिली ते बारावीचे २ लाख ४३ हजार ४८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित झालेली आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेणे शक्य नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी पहिली ते नववीच्या तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. गतवर्षी कोरोनाच्या कारणामुळे पहिली ते चवथीचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळा १५ दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या लाटेत या शाळाही बंद करण्यात आल्या.