कर्मचारी मिळालेच नाही ; आरोग्य उपकेंद्र कुलूप बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:34+5:302021-06-06T04:30:34+5:30
देपूळ : ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची सुविधा उपलब्ध केली जाते तर दुसरीकडे पदभरती नसल्याने कर्मचाऱ्यांचा ...
देपूळ : ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची सुविधा उपलब्ध केली जाते तर दुसरीकडे पदभरती नसल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. वारा जहागीर येथे तीन वर्षांपूर्वी आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत बांधण्यात आली ; परंतु कर्मचारी मिळाले नसल्याने अद्यापही या इमारतीचे कुलूप उघडण्यात आले नाही.
सन २०१७-२०१८ या वर्षात लाखो रुपये खर्च करून वारा जहागीर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. परंतु या उपकेंद्रासाठी आवश्यक पदाची निर्मिती करून पदभरती करण्यात आली नाही. कोरोना कार्यकाळात तरी वारा जहागीर उपकेंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, वरिष्ठ स्तरावर याची दखल घेण्यात न आल्याने कोरोनाकाळात ग्रामीण भागातील रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. वारा जहागीर, देपूळ, देगाव, लही कुंभी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याची सोय म्हणून सदर उपकेंद्र सुरू केव्हा होणार? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, वारा जहागीर आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य अर्चना डिगांबर खोरणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ३ जून रोजी निवेदन दिले.