शिक्षक नाही मिळाले, ZP शाळेला कुलूप ठोकले; गावकरी आक्रमक
By संतोष वानखडे | Published: February 12, 2024 12:50 PM2024-02-12T12:50:06+5:302024-02-12T12:50:34+5:30
संबंधित शिक्षकाने भोयता शाळेवर रूजू व्हावे याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशितही केले होते.
वाशिम : वाशिम तालुक्यातील भोयता येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळाले नसल्याने अखेर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि १२ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकले. भोयता येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय दत्तराव वाघ हे शाळेत रुजू झाले होते. मात्र, अचानक १८ डिसेंबर २०२३ पासून शाळेवर परत आले नाहीत. ते जि.प. शाळा धानोरा बु. येथे बदली करून रुजू झाल्याने भोयता येथील शाळेत शिक्षकाचे पद रिक्त झाले. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संबंधित शिक्षकांनी भोयता शाळेत रुजू होण्याबाबत यापूर्वी गावकऱ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
संबंधित शिक्षकाने भोयता शाळेवर रूजू व्हावे याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशितही केले होते. परंतू, अद्यापही ते रूजू झाले नाहीत, असे निवेदनात नमूद आहे. संबंधित शिक्षकांनी भोयता शाळेवर रूजू व्हावे अन्यथा शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागात विद्यार्थ्यांची शाळा भरविली जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्र देशमुख, राहुल तिडके व पालकांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही शिक्षक रुजू झाले नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी १२ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष निलेश पोले, राहुल तिडके सुनील इंगळे, दीपक नितनवरे, भगवान वानखडे, विजय देवकर, अनिल गायकवाड, रमेश पोले, सिद्धार्थ इंगळे, भीमराव राऊत यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.