ना स्वच्छतागृह, ना स्वतंत्र शौचालय; तरीही गृहविलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:42 AM2021-05-23T11:42:47+5:302021-05-23T11:43:08+5:30
Washim News : ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी देण्यात येत आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू आहेत, जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे; तर दुसरीकडे ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. यामुळे कोरोनाबाधितापासून कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात १४०१ रुग्ण अधिक आढळून आले होते. मे महिन्यात आतापर्यंत शहरी भागात ५८०७ तर ग्रामीण भागात ७४७६ रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील रुग्णाच्या घरी स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था नसतानादेखील गृहविलगीकरणाला परवानगी दिली जात आहे. यामुळे घरातील एकाच स्वच्छतागृह, शौचालयाचा वापर हा रुग्ण व कुटुंबातील इतर सदस्यांकडून केला जातो. परिणामी, कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. गोवर्धन, शिरपूर, अनसिंग, धमधमी, शेलुबाजार, खैरखेडा या गावात एकाच कुटुंबातील अधिकाधिक सदस्यांना संसर्ग झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध असतानाही गृहविलगीकरणावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांकडून कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात सध्या ३७५६ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी केवळ ४७२ रुग्ण खासगी कोविड तसेच सरकारी कोविड केअर सेंटर, रुग्णालयात भरती आहेत तर उर्वरीत तब्बल ३२८४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यास गृहविलगीकरणाला परवानगी देऊ नये, असा सूर वैद्यकीय क्षेत्रासह ग्रामीण भागातील सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.
.. तर यापुढे गृहविलगीकरण पूर्णत: बंद !
जिल्ह्यात ग्रामीण भगाात रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. यापुढे संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार असून, असा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २२ मे रोजी काढला. काही निवडक परिस्थिती वगळता यापुढेही गृहविलगीकरण पूर्णत: बंद करण्यात यावे. यासाठी प्रत्येक गावात संस्थात्मक विलगीकरणासाठी इमारती शोधण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
संबंधित इमारतीमध्ये पिण्याचे व वापरण्याचे पाणी,. पंखा, विद्युत दिव्याची व्यवस्था, शौचालय यापैकी काही व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायतीकडील १५ व्या वित्त आयोगातून दुरुस्तीची कामे घेऊन प्रत्येक गावात अशा इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी सज्ज ठेवाव्यात. अशा संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णास त्यांचे घरुन जेवणाचा डब्बा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची मुभा देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या.
यापूढे गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यास, लक्षणे नसलेले रुग्ण या इमारतीमध्ये संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात येतील. जे रुग्ण या संस्थात्मक विलगीकरणाच्या अटी व शतीर्चे पालन करणार नाहीत अशा सर्व रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणावरील कोविड केअर सेंटर येथे तातडीने हलविण्यात यावे. आवश्यकता पडल्यास गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.